ब्रह्मांड ऊर्जेसाठीे मंदिरात पुरली सुवर्णयंत्रे

By admin | Published: January 6, 2017 04:36 AM2017-01-06T04:36:13+5:302017-01-06T04:36:13+5:30

राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या पाथर्डी येथील मोहटादेवी देवस्थानने तब्बल दोन किलो सोन्याची ‘सुवर्णयंत्रे’ बनवून ती मंदिराच्या बांधकामात मूर्तीखाली पुरली आहेत.

Gold medicines buried in the temples for the energy of the universe | ब्रह्मांड ऊर्जेसाठीे मंदिरात पुरली सुवर्णयंत्रे

ब्रह्मांड ऊर्जेसाठीे मंदिरात पुरली सुवर्णयंत्रे

Next

सुधीर लंके, अहमदनगर
राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या पाथर्डी येथील मोहटादेवी देवस्थानने तब्बल दोन किलो सोन्याची ‘सुवर्णयंत्रे’ बनवून ती मंदिराच्या बांधकामात मूर्तीखाली पुरली आहेत. तिरुपती बालाजी, मुंबईचा सिद्धिविनायक, कोल्हापूरची महालक्ष्मी, शनिशिंगणापूर याही मंदिरांत अशी यंत्रे बसवली गेल्याचा दाखला देत देवस्थानने हा प्रताप केला.
यंत्रांची निव्वळ मजुरी व त्यावरील मंत्रोच्चारासाठी २५ लाखांचा अफाट खर्च केला गेला. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या देवस्थानचे हे सुवर्ण पुराण वैधानिक आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मोहटादेवी गडावर प्रसिद्ध रेणुकामातेचे मंदिर आहे. राज्य, तसेच देशभरातील भाविक येथे येतात. सन २००९ मध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी १२ कोटींची निविदा काढण्यात आली. जीर्णोद्धार करताना मंदिरात ६४ योगिनी व काळभैरव, गणपती, मारुती अशा ९१ मूर्ती बसविण्याचे ठरले. मात्र, नुसत्याच मूर्ती नव्हे तर ब्रम्हांडातून ऊर्जा मिळविण्याच्या नावाखाली त्यांच्याखाली सुवर्ण यंत्र पुरण्याचा अजब ठराव विश्वस्तांनी १२ सप्टेंबर २०१० रोजी केला.
सोन्याची ही यंत्रे बसविण्याचे काम संस्थानने मे. ओ.एस.ए. आर्किटेक्ट संस्थेचे रवींद्र शिंदे यांना दिले. या आर्किटेक्ट संस्थेनेही चक्क हा अध्यात्मिक ठेका स्वीकारला. कुठलीही निविदा न काढता लाखो रुपयांचे हे काम या संस्थेने सोलापूर येथील पंडित प्रदीप जाधव यांना दिले.
या सुवर्ण यंत्रांसाठी देवस्थानचे १ किलो ८९० ग्रॅम सोने वापरले गेले. या सोन्याची सुवर्ण यंत्रे बनविण्यासाठी निव्वळ मजुरी व विधीपोटी संस्थानने जाधव यांना २४ लाख ८५ हजार रुपये अदा केल्याचे कागदोपत्री दिसते. यावर्षीच्या नवरात्रीपर्यंत ही यंत्रे मूर्तीखाली पुरण्याचे काम सुरु होते, असे विश्वस्तांनी सांगितले. हा लाखो रुपयांचा खर्च कोणत्या नियमाने करण्यात आला? यंत्रे खरोखरच पुरण्यात आली का? पुरले ते सोनेच आहे का? अशा शंका आता उपस्थित झाल्या आहेत. सुवर्ण यंत्रे दोन वर्षांपूर्वी बनविण्यात आली. ते काम करताना आपण ‘सीईओ’ नव्हतो. त्यामुळे याबाबतचा तपशील तत्कालीन पदाधिकारीच सांगू शकतील, असे देवस्थानचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

संस्थानच्या विद्यमान अध्यक्षांशीही ‘लोकमत’ने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अद्याप होऊ शकलेला नाही. दरम्यान, ‘सुवर्ण यंत्रांची मजुरी व सोने परस्पर ठरले आहे, सुवर्ण यंत्र कशी करायची व कोणाकडून करायची? याबाबत काहीही माहिती दिली गेलेली नाही. सोने व धनादेश देण्याबाबत आपणाला केवळ तोंडी आदेश दिले जातात, असा आक्षेप नोंदविणारे पत्र १५ मार्च २०११ रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अध्यक्षांना दिले आहे. मात्र या पत्राची दखल घेतली गेली नाही.



उच्च न्यायालयाकडे तक्रार
मोहटा देवस्थानच्या कारभारात माजी विश्वस्त नामदेव गरड यांना अनेक आक्षेपार्ह बाबी आढळल्या आहेत. देवस्थानवर जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष असल्याने त्यांनी यासंदर्भात थेट उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, धर्मादाय आयुक्त, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीत त्यांनी अनेक गंभीर बाबी निदर्शनास आणल्या आहेत.

देवस्थानवर न्यायाधीश अध्यक्ष
जिल्हा व सत्र न्यायाधीश हे मोहटादेवी देवस्थानचे प्रमुख असतात. सह जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष असतात. देवस्थान मंडळात एकूण १५ विश्वस्त आहेत. त्यात पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपवनसंरक्षक हे पदसिद्ध सदस्य आहेत. याशिवाय मोहटा गावातील पाच ग्रामस्थ तसेच नगर-पाथर्डी विभागातील पाच नामवंत नागरिकांची जिल्हा न्यायाधीशांमार्फत नियुक्ती होते.

Web Title: Gold medicines buried in the temples for the energy of the universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.