सोन्याचा दर २६ हजारांवर
By admin | Published: November 9, 2015 03:15 AM2015-11-09T03:15:37+5:302015-11-09T03:15:37+5:30
धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने प्रतितोळा २६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे सोने खरेदीला वेग आला आहे. दसऱ्यात चढ्या भावामुळे ३० टक्क्यांनी घटलेला सोन्याचा बाजार उद्या
चेतन ननावरे, मुंबई
धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने प्रतितोळा २६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे सोने खरेदीला वेग आला आहे. दसऱ्यात चढ्या भावामुळे ३० टक्क्यांनी घटलेला सोन्याचा बाजार उद्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर २० ते २५ टक्क्यांनी वधारण्याची शक्यता सराफा संघटनेने व्यक्त केली आहे.
दसऱ्याला प्रतितोळा २७ हजारांचा टप्पा ओलांडलेले सोने ऐन दिवाळीत अपेक्षेप्रमाणे २६ हजारांवर उतरले आहे. त्यामुळे सोने खरेदीला वेग मिळालेला आहे. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले, की साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला सोन्याचा दर प्रतितोळा २७ हजार ४०० इतका होता. त्यामुळे ग्राहकांनीही खरेदीला हात आखडता घेतला. मात्र दिवाळीत अपेक्षेप्रमाणे सोने पुन्हा प्रतितोळा २६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहे.
त्यामुळे तेजीचे वातावरण आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर गेल्या चार वर्षांत सोन्याचा दर कधीच २७ हजार रुपयांखाली गेला नव्हता. मात्र यंदा २६ हजार रुपयांपर्यंत उतरलेले सोने २५ हजार ५०० रुपयापर्यंत उतरण्याची शक्यता जैन यांनी व्यक्त केली आहे.
जैन यांच्या म्हणण्यानुसार, साडेतीन मुहूर्तांपैकी पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाईल. शिवाय त्याआधी सोन्याचा दर कमी असल्याने खरेदीतील उत्साह कायम राहील.
दसऱ्याला सराफा बाजाराचा व्यवसाय ३० टक्क्यांनी घटला होता. त्यावेळी उलाढाल २२५ कोटी रुपयांपर्यंत घसरली होती. मात्र दिवाळीत २० ते २५ टक्क्यांनी अधिक व्यवसाय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा सराफा बाजारात ३२५ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.