अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने चमकले

By admin | Published: April 29, 2017 03:07 AM2017-04-29T03:07:20+5:302017-04-29T03:07:20+5:30

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा पेढ्यांवर शुक्रवारी गर्दी केली होती. तर अनेकांनी गृह खरेदीसाठीही हा मुहूर्त साधला.

Gold shines on the auspicious day of Akshaya Trutiya | अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने चमकले

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने चमकले

Next

मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा पेढ्यांवर शुक्रवारी गर्दी केली होती. तर अनेकांनी गृह खरेदीसाठीही हा मुहूर्त साधला.
सोने, हिरे आणि बुलियन बाजाराने या मुहूर्ताच्या जोरावर सरासरी २०० कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी स्पष्ट केले. जैन म्हणाले की, गेल्या आठवड्याभरापासून सराफा बाजारात खरेदीसाठी उत्साह दिसून आला. अक्षय तृतीयेला झालेली खरेदी दररोज होणाऱ्या उलाढालीहून १५ टक्के अधिक आहे. शनिवार आणि रविवारीही खरेदीतील हा उत्साह कायम दिसेल, अशी सराफांना अपेक्षा आहे. त्यामुळे सरासरीहून ३० ते ३५ टक्के अधिक व्यवसाय दोन दिवसांत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोठ्या दागिन्यांच्या तुलनेत सोनसाखळी, अंगठी, बांगड्या, झुमके अशा कमी वजनाच्या आणि लहान आकाराच्या दागिन्यांना बाजारात अधिक मागणी होती. मागणीत झालेल्या वाढीमुळे सोन्याच्या दरात दिवसभरात ३०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. तरीही यंदा सोन्याचा दर प्रतितोळा ३० हजार रुपयांखाली असल्याने ग्राहकांनीही सोने खरेदीत उत्साह दाखवला.
गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागलेल्या गृह खरेदीतील बऱ्याचशा प्रकल्पांमधील घरे बुकिंगशिवाय पडून होती. मात्र अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या प्रकल्पांतील घरे विकण्याचा ‘श्री गणेशा’ झाला. पनवेल, कल्याण, बदलापूर, विरार येथील घरांना सेकंड होमचा पर्याय देत मुंबईकरांनी ही गुंतवणूक केल्याचा अंदाज विकासकांमधून व्यक्त होत आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळालेल्या प्रतिसादाचा फायदा पुढील प्रकल्पांना मिळेल, अशी अपेक्षा रिअल इस्टेट क्षेत्रातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gold shines on the auspicious day of Akshaya Trutiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.