सोने तस्करीचे धागे मुंबईत
By admin | Published: January 11, 2015 12:50 AM2015-01-11T00:50:34+5:302015-01-11T00:50:34+5:30
धावत्या रेल्वेत लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या आठ किलो सोन्याचे धागे मुंबईतील तीन बड्या व्यावसायिकांशी जुळले असून, या तिघांची लोहमार्ग पोलीस चौकशी करीत आहे.
शहाला जामीन : तीन बड्या व्यावसायिकाची नावे उघड
नागपूर : धावत्या रेल्वेत लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या आठ किलो सोन्याचे धागे मुंबईतील तीन बड्या व्यावसायिकांशी जुळले असून, या तिघांची लोहमार्ग पोलीस चौकशी करीत आहे.
दरम्यान, सोन्याची तस्करी करण्याच्या संशयावरून पकडण्यात आलेल्या देवांग जयेंद्र शहा (३२, नालासोपारा, जि़ ठाणे) याची आज कोर्टाने वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली आहे.
कोलकाताहून मुंबईकडे शस्त्रासह सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती जीआरपीचे अधीक्षक दिलीप झळके यांना मिळाली होती. त्यावरून जीआरपीचे जवान आणि गुन्हेशाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने नागपूरपासून १२१०२ अप ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील विविध डब्यांची झडती घेतली. भुसावळजवळ बोगी क्रमांक बी- १ च्या बर्थ क्रमांक ३९ वर शहा बसून होता.
संशय आल्याने शहाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या अंगातील जॅकेटमध्ये पोलिसांना आठ किलो सोन्याच्या कॅटबरी आढळल्या. सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचे हे सोने पोलिसांनी जप्त केले. लोकमतने आज हे वृत्त ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर संबंधित वर्तुळात खळबळ निर्माण झाली.
दरम्यान,लोहमार्ग गुन्हे शाखेचे निरीक्षक वासुदेव देसले व लोहमार्गचे निरीक्षक आनंदा महाजन यांनी रात्रभर शहाला विचारपूस केली. त्याने मुंबईतील तीन बड्या व्यावसायिकांची नावे सांगितली. त्याला आज कोर्टात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली. दरम्यान, त्याने सांगितलेल्या माहितीची आणि व्यापाऱ्यांची पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)