लक्ष्मी मंदिरातून सोन्याच्या मुर्तीची चोरी
By admin | Published: July 25, 2016 08:28 PM2016-07-25T20:28:02+5:302016-07-25T20:28:02+5:30
येथील लक्ष्मी देवीच्या मंदिरातून पाच तोळे सोन्याची बनविलेली लक्ष्मीची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याचबरोबर १० गॅ्रम चांदीसह सुमारे १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २५ : खरातवाडी (ता. पंढरपूर) येथील लक्ष्मी देवीच्या मंदिरातून पाच तोळे सोन्याची बनविलेली लक्ष्मीची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याचबरोबर १० गॅ्रम चांदीसह सुमारे १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना सोमवार दि. २४ जुलै रोजी उघडकीस आली.
आषाढ महिना असल्याने मंगळवार दि. १९ जुलै रोजी खरातवाडीतील लक्ष्मी देवीची यात्रा भरविण्यात आली होती. या यात्रेसाठी पंचक्राशीतील भाविक भक्तांनी गर्दी केली होती. मात्र या यात्रेच्या काळात बुधवारी व गुरूवारी चोरट्यांनी देवीच्या मंदिरात पाच तोळे सोन्यापासून तयार करण्यात आलेली देवीच्या मूर्तीची सोमवारी (दि. २४ जुलै) खरातवाडी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
सोन्याची देवीची मूर्ती तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी अर्धा तोळा, तोळा असे सोने आपआपल्या परीने दान केले होते.
यातून ही मूर्ती बनविण्यात आली होती. याच बरोबर १० ग्रॅम चांदीही ग्रामस्थांनी दान म्हणून देवीला अर्पण केली होती. पाच तोळे सोन्याच्या मूर्तीसाठी सुमारे दीड लाख रूपये व १० हजार रूपये किंमतीची चांदी असा १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लक्ष्मी देवीच्या देवळातून चोरून नेला. याबाबत देवीचे पुजारी दादा समर्थ खरात व हरिभाऊ खरात यांनी करकंब पोलीस ठाण्यात खबर देण्यासाठी गेले होते. मात्र तेथील पोलिसांनी साहेब सध्या नाहीत तुम्ही उद्या या, साहेबांना सांगून तक्रार घ्यावी लागेल, असे सांगितल्याने करकंब पोलीस ठाण्यात अद्याप या घटनेचा गुन्हा दाखल झाला नाही.
लक्ष्मी मातेच्या मूर्तीसाठी गावातील दानशूर लोकांनी सोने व चांदी दान दिले होते. यातूनच देवीची मूर्ती बनविण्यात आली आहे. मागील मंगळवारी यात्रा पार पडली. मात्र बुधवारी अथवा गुरूवारी चोरट्यांनी ही देवीची मूर्ती मंदिरातून लंपास केली आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी आम्ही करकंब पोलीस ठाण्यात आज (सोमवारी) गेलो होतो. मात्र ठाणे अंमलदार यांनी आम्हाला साहेब नाहीत, उद्या या, असे सांगितले.
- हरिभाऊ खरात
ग्रामस्थ, खरातवाडी