सोने व्यापारी धास्तावले
By Admin | Published: November 13, 2016 03:03 AM2016-11-13T03:03:34+5:302016-11-13T03:03:34+5:30
चलनातून रद्द केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांचा काळा पैसा सोन्यात पिवळा केला जात असल्याचे वास्तव लोकमत स्टिंगमधून उघड करताच व्यापारी मंडळी धास्तावल्याचे
मुंबई : चलनातून रद्द केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांचा काळा पैसा सोन्यात पिवळा केला जात असल्याचे वास्तव लोकमत स्टिंगमधून उघड करताच व्यापारी मंडळी धास्तावल्याचे चित्र पहावयास मिळाले. झवेरी, दागिना बाजारांसहीत अनेक व्यापाऱ्यांनी कारवाईच्या भितीने दुकाने बंद केलेली दिसून आली. तर आयकर विभागासह गुन्हे शाखेचाही या व्यापाऱ्यांवर वॉच आहे.
मंदितला पॉज कमी करण्याच्या आशेने मुंबईतील सोने व्यापाऱ्यांनी खुलेआम थाटलेल्या काळा पैशांचा बाजार ’लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये कैद करण्यात आला होता. यामध्ये मुलुंड, भायखळा, आग्रीपाडा, नागपाडा, तसेच झवेरी आणि दागिना बाजार येथील दुकानांचा आढावा घेण्यात आला होता. या ठिकाणांपैकी अनेकांकडे छुप्या पद्धतीने बाजारात अवघ्या ३० ते ३२ हजार रुपयांत मिळणारे सोने ५० ते ७० हजार रुपयांत विकले जात होते.
शनिवारी बाजारात लोकमत प्रतिनिधींनी पुन्हा फेरफटका मारला. तेव्हा अनेकांनी रद्द केलेल्या नोटा घेण्यास नकार दिला. मुळात पोलिसांकडून तपासणी सुरु असल्याने कोणीच पैसे घेणार नाही असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर काहींनी चक्क दुकानच बंद ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या काळया पैशांवर आयकर विभागही लक्ष ठेवून आहे. (प्रतिनिधी)
- याबाबत अधिक तपास सुरु आहे. व्यापाऱ्यांकडून अशा रद्द नोटांचा वापर होत असल्यास आयकर विभाग त्यावर लक्ष ठेवून आहे. शिवाय आमच्या समोरही असे काही आढळल्यास यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असे गुन्हे शाखेचे सहआयुक्त संजय सक्सेना यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.