...तर सोन्यावरही लागेल प्राप्तिकर
By Admin | Published: September 21, 2015 02:00 AM2015-09-21T02:00:24+5:302015-09-21T02:00:36+5:30
घराघरांतील सोने बाहेर काढून त्यावर निश्चित स्वरूपाचा परतावा देणारी सुवर्ण बचत योजना सरकारने जरी सादर केली असली तरी, या योजनेअंतर्गत सोन्याची ठेव ठेवण्याचे जे निकष सादर करण्यात आले आहेत,
मनोज गडनीस, मुंबई
घराघरांतील सोने बाहेर काढून त्यावर निश्चित स्वरूपाचा परतावा देणारी सुवर्ण बचत योजना सरकारने जरी सादर केली असली तरी, या योजनेअंतर्गत सोन्याची ठेव ठेवण्याचे जे निकष सादर करण्यात आले आहेत, त्यानुसार ठेवी रूपाने जमा करण्यात येणाऱ्या सोन्याचा स्रोत ग्राहकाला स्पष्ट करावा लागणार आहे. तो स्पष्ट न करू शकल्यास ग्राहकाला त्या सोन्याच्या मूल्यावर त्या तुलनेत इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.
15 सप्टेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात कार्यालयीन पत्रक काढून सोन्याच्या या योजनेवर लक्ष ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, भारतीयांची सोन्याची हौस आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेली सोने खरेदीची परंपरा लक्षात घेता या निकषांपेक्षा कित्येकपट अधिक सोने लोकांच्या घरी असेल. तसेच, त्यावर जर करभरणा करावा लागणार असेल तर या योजनेत सहभागी होण्यास फारशी पसंती मिळणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.
विवाहित स्त्रीला ५०० ग्रॅमपर्यंत सोन्याचा स्रोत जाहीर न करता या योजनेत सहभागी होता होईल. यापेक्षा १ ग्रॅम जरी अधिक सोने असेल तरी त्या सोन्याच्या खरेदीचा संपूर्ण स्रोत देतानाच त्यावर प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार करभरणा करावा लागेल.
ज्या स्त्रीचा विवाह झालेला नाही अशा
स्त्रीला २५० ग्रॅमपर्यंत सोने ठेवता येईल; त्यावरील सोन्याचा स्रोत जाहीर करतानाच त्यावर करभरणा करावा लागेल.
पुरुषांकरिता ही मर्यादा १०० ग्रॅम
आहे. यावरील सोन्याकरिता स्रोत जाहीर करतानाच करभरणा करावा लागेल.