बालभारतीच्या सोनेरी पानांचे डॉक्युमेंटेशन
By admin | Published: March 6, 2016 01:17 AM2016-03-06T01:17:23+5:302016-03-06T01:17:23+5:30
आठवणींतील कविता, कलाकृतींचा कप्पा जिवंत ठेवणारी ‘बालभारती’...!! प्रत्येक पिढीला या नावात आपलेपणाचा ओलावा अनुभवता येतो
पुणे : आठवणींतील कविता, कलाकृतींचा कप्पा जिवंत ठेवणारी ‘बालभारती’...!! प्रत्येक पिढीला या नावात आपलेपणाचा ओलावा अनुभवता येतो. शालेय जीवनाशी नाळ जुळलेल्या या रेशमीबंधाचे विविध पैलू आता सोनेरी पानांमधून उलगडणार आहेत. बालभारतीच्या इतिहासापासून ते विकासाचा, वाढीचा प्रत्येक टप्पा ‘कॉफीटेबल पुस्तका’तून पुढील पिढ्यांना अनुभवता येणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या सर्व टप्प्यांचे पुस्तक, डिजिटल अशा दोन्ही पद्धतीने दस्तऐवजीकरण होणार आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजेच बालभारतीचे यंदा हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या बालभारतीची पिढ्यान्पिढ्यांची नाळ आहे. शालेय जीवन तर बालभारतीशिवाय अपूर्णच. त्यामुळे प्रत्येकासाठीच जिव्हाळ्याची असणाऱ्या बालभारतीत पन्नाशीत पदार्पण करताना, मागील कालखंडाचा मागोवा घेण्याचे ठरवले आहे. ५० वर्षांतील बालभारतीचा इतिहास, बदल, ते नव्या तंत्रज्ञानाकडे वाटचाल हे सगळे महत्त्वाचे टप्पे आहेत; मात्र त्यांचे योग्य वेळी जतन न झाल्यास काळाच्या ओघात त्या संदर्भातील दस्तऐवजच नष्ट होऊन जाईल. त्यामुळे येथील प्रत्येक गोष्टीचे जतन करण्याची गरज ओळखून बालभारतीने दस्तऐवजीकरण करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात शुक्रवारी बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात आली आहे.
दस्तऐवजीकरणामध्ये कॉफीटेबल पुस्तक, चित्रफीत व माहितीपुस्तिका हा महत्त्वाचा भाग राहणार आहे. कॉफीटेबल पुस्तकाचे स्वरूप इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत राहणार आहे.
मात्र, पुस्तकात ठळक घटकांचा समावेश होणार असून, विस्तृत स्वरूपातील माहिती ही चित्रफीत स्वरूपात, तसेच माहिती पुस्तिकांची निर्मिती केली जाणार आहे.
(प्रतिनिधी)