गोल्डन मॅन दत्तात्रय फुगेचा दगडाने ठेचून खून
By admin | Published: July 15, 2016 07:04 AM2016-07-15T07:04:54+5:302016-07-15T09:19:44+5:30
सोन्याचा शर्ट शिवल्यामुळे चर्चित आलेल्या गोल्डन मॅन दत्तात्रय फुगे यांचा शुक्रवारी मध्यरात्रि बाराच्या सुमारास दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.१५ - सोन्याचा शर्ट शिवल्यामुळे जगभर गाजलेले पिंपरी-चिंचवडचे गोल्डमॅन दत्ता फुगे यांचे चार ते पाच जणांनी घरातून अपहरण करून दगडाने ठेचून निर्घृण खून केला. दिघी येथील भारतमातानगर भागात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्थिक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार-पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये फुगे यांच्या पुतण्याचाही समावेश आहे.
रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील राहत्या घरातून फुगे यांना चार ते पाचजणांनी बळजबरीने नेले होते, अशी माहिती त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी पोलिसांना दिली. दिघीच्या भारतमातानगरमध्ये रात्री बाराच्या सुमारास फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले तसेच दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले. घटना स्थळावर पोलिसांना कोयता मिळाला आहे. पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व फुगे यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला.
फुगे हे खासगी सावकारीचा व्यवसाय करीत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंड फंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी हल्लेखोरांबरोबर फुगे यांचे पैशांवरून भांडण झाले होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
दत्ता फुगे यांच्या पत्नी सीमा फुगे या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. दत्ता फुगे हे स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.
अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे ते पिंपरीचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जात. सुमारे साडेतीन किलो सोन्याचा शर्ट बनवून त्यांनी विश्वविक्रम नोंदविल्याने ते एकदम प्रसिद्धीझोतात आले होते. सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वादग्रस्त ठरलेल्या फुगे यांना काही महिन्यापूर्वी पोलिसांनी तडीपारीची नोटीसही बजावली होती.