चिटफंडमुळे गोल्डमॅन अडचणीत

By admin | Published: July 16, 2016 12:49 AM2016-07-16T00:49:39+5:302016-07-16T00:49:39+5:30

चिटफंडाच्या माध्यमातून अनेकांना देशोधडीला लावण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडत आहेत. मात्र, त्यावर पोलिसांचा कोणताही अंकुश नाही.

Goldman Troubles With Chitfund | चिटफंडमुळे गोल्डमॅन अडचणीत

चिटफंडमुळे गोल्डमॅन अडचणीत

Next


भोसरी : चिटफंडाच्या माध्यमातून अनेकांना देशोधडीला लावण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडत आहेत. मात्र, त्यावर पोलिसांचा कोणताही अंकुश नाही. त्यामुळे अधिक व्याजाचे आमिष दाखवून चिटफंडाच्या माध्यमातून आर्थिक संकटात सापडलेल्या गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांना आपला जीव गमवावा लागला. पूर्ववैमनस्य
आणि आर्थिक व्यवहारांमुळे फुगे यांचा खून झाला.
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत चिटफंड कंपन्यांचे पीक आले आहेत. ज्यांनी कोणतेही लायसन्स घेतले नाही. चिटफंडच्या माध्यमातून फक्त अधिकृत भिशी चालविणे हा एकमेव फंडा चिटफंड कंपन्यांचा आहे. मात्र, लोकांना एक वर्षात दुप्पट-तिप्पट पैसे करतो, अशी मोठमोठी आमिषे दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. चुकीचे व्यवहार केल्याने आणि अनेकांना आर्थिक गंडा घातल्याने अनेकांवर जिवावर बेतण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे दत्तात्रय फुगे यांचा खून होय. आमिषाला बळी पडून लाखो रुपये नागरिक या चिटफंडमध्ये गुंतवणूक करीत आहेत. पैसे वेळेवर मिळाले नाहीत की, मग चुकीचा मार्ग अवलंबिला जात आहे. फुगे यांचा भोसरीत वक्रतुंड चिटफंड होता. तसेच लांडेवाडीत चिटफंड, भिशी, फायनान्सचे व्यवसाय होते.
२०१२च्या निवडणुकीत फुगे यांची पत्नी सीमा फुगे या राष्ट्रवादीच्या तिकिटावर भोसरी गावठाण भागातून निवडून आल्या होत्या. मात्र, जातदाखला बनावट असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांचे नगरसेवकपद गेले होते. शहर व परिसरात चिटफंडच्या माध्यमातून पटकन पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी नागरिकांनी त्यांच्या चिटफंडामध्ये लाखो, कराडो रुपये गुंतवले होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून फुगे यांच्यावर बोगस चिटफंड व्यवहार, अनेक ठिकाणी चिटफंडचे पैसे दिले नाहीत म्हणून विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले होते. मात्र, पोलिसांबरोबर साटेलोटे होते. (वार्ताहर)

फुगे यांना सोन्याची मोठी हौस होती. त्यातूनच त्यांनी २०१२मध्ये सोन्याचा साडेतीन किलो वजनाचा व सुमारे एक कोटी २० लाख रुपये किमतीचा शर्ट तयार करून घेतला होता. या शर्टमुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र, या शर्टच्या प्रसिद्धीपासूनच त्यांच्या व्यवसायात त्यांना अडचणी निर्माण झाल्या. याशिवाय पत्नीचे नगरसेवकपद गेल्याने ते आणखीनच अडचणीत आले होते. त्यामुळे ते अज्ञातवासात असत. चिटफंडमधील पैसे वेळेवर परत करू न शकल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. पैसे गुंतवलेले लोक त्यांच्याकडे चकरा मारत आहेत. याबाबत पोलीसही दाद देत नव्हते.

दत्तात्रय फुगे यांच्या-वरील गुन्हे
भोसरीसह चिंचवड ठाण्यात फसवणुकीचे दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
सांगली न्यायालयात एक दावा सुरू होता.
चिटफंडच्या व्यवहारावरून खडकी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अपंग व माजी सैनिकच्या गुन्ह्यामध्ये फुगे यांना फरार घोषित केले होते.
पाच गुन्ह्यांत दोघा भागीदारांसह त्यांना अटक झाली होती.
भोसरीत निवडणुकीत माघार घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागण्यावरून एका व्यक्तीबरोबर झालेल्या वादात पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटनाही घडली होती.
पत्नी सीमा फुगे यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र तयार केल्याबद्दल येरवडा व भोसरीत दाखल केला होता. त्या वेळी दोन महिने पती-पत्नी फरार होते.

मुलाने पाहिला थरार
भोसरी : वेळ रात्री दहाची. आम्ही जेवायला बसणार होतो. त्या वेळी अतुल मोहितेंबरोबर वडील गेल्याचे कळले आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन् वडील नेमके गेले कुठे? याची खात्री करण्यासाठी मी दिघीच्या दिशेने निघालो, तर समोरच काही लोक वडिलांना मारहाण करीत होते, असे सांगत होता, गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांचा मुलगा शुभम.
शुभम फुगे याने वडिलांवर झालेल्या हल्याविषयी माहिती दिली. तो म्हणाला, ‘‘गुरुवारी सायंकाळी सातची वेळ माझ्या मोबाइलवर अतुल मोहिते यांचा फोन आला. तुझ्या वडिलांचा फोन लागत नाही. ते वाढदिवसाला दिघीला येणार होते. तू त्यांना निरोप दे! त्यानंतर मोबाइलवरून परत रात्री दहा वाजता फोन आला. निरोप दिला आहेस का? अखेर मी वडिलांना दिघीला वाढदिवसाला बोलावले असल्याचा निरोप दिला. त्यानंतर वडिलांनी मला बिर्याणी आणण्यासाठी निगडीला पाठविले. आल्यानंतर पाहतो, तर वडील वाढदिवसाला दिघीला निघून गेले होते. त्याचवेळी माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली. त्यामुळे तातडीने मी माझ्या मित्रांसह दिघीच्या दिशेने निघालो.
भारतमातानगरमध्ये पोहचल्यावर समोर अंधारात मोठा गोंधळ सुरू होता. थोडं पुढे
गेल्यावर पाहिले, तर वडिलांना दहा-बारा जण मारत होते. मात्र, माझी गाडी बघून हल्लेखोर वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून पसार झाले. नियोजनबद्धरीत्या वडिलांना संपविले आहे.’’ (वार्ताहर)

Web Title: Goldman Troubles With Chitfund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.