चौथ्या बंदरामुळे हजारो पारंपरिक मच्छीमारांवर गंडांतर
By admin | Published: January 17, 2017 03:07 AM2017-01-17T03:07:51+5:302017-01-17T03:07:51+5:30
जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या भरावामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या परिसरातील हजारो मच्छीमारांचा रोजगार बुडाला
उरण : जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या भरावामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या परिसरातील हजारो मच्छीमारांचा रोजगार बुडाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक मच्छीमारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या (सिंगापूर) बंदराच्या अधिकाऱ्यांनाच घेराव घातला. मच्छीमारांना प्रत्येकी आठ लाखांची आर्थिक नुकसानभरपाई न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मच्छीमारांनी सिंगापूर बंदर प्रशासनाला दिला.
जेएनपीटीच्या चौथ्या (सिंगापूर) बंदराचे काम सध्या जोरात सुरू झाले आहे. सात हजार कोटी खर्चून बांधण्यात येणारे हे बंदर जेएनपीटीतील सर्वात मोठे बंदर आहे. या बंदराच्या उभारणीनंतर जेएनपीटी कंटेनर आयात निर्यातीची क्षमता ५० लाखाने म्हणजे दुपटीने वाढणार आहे. या बंदराच्या उभारणीसाठी सध्या समुद्रात जोरदार भरावाचे काम सुरू आहे. या माती, दगडाच्या प्रचंड भरावामुळे स्थानिक मच्छीमार अडचणीत आले आहेत. पारंपरिक मासेमारी करणाऱ्या पाणजे, डोंगरी, घारापुरी आदि गावातील हजारो मच्छीमारांवर गंडांतर आले आहे. रोजगार बुडाल्याने हजारो मच्छीमारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.
या मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, यासाठी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या बंदर प्रशासनाच्या विरोधात मच्छीमारांनी जोरदार आंदोलन केले. मच्छीमारांना न्हावा शेवा सागरी सेतू बाधित प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या रकमेपेक्षा ३० टक्के अधिक म्हणजे प्रत्येक मच्छीमाराला आठ लाखप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची मागणी मच्छीमारांनी सिंगापूर बंदराचे रिजनल डायरेक्टर वॅनची फुंग ची यांच्याकडे केले. संतप्त मच्छीमारांनी सिंगापूर बंदर प्रशासनाविरोधात घोषणा देतानाच बंदराचे सीईओ सुरेश कुमार, जगताप, सावंत आदि अधिकाऱ्यांना घेराव घातला.
न्हावा शेवा सागरी सेतूबाधित प्रकल्पग्रस्तांना प्रकल्प सुरू होण्याआधीच मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यासाठी एमएमआरडीने सकारात्मक पावले उचलली आहेत. याकडे लक्ष वेधतानाच मच्छीमारांनी होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे बंदर अधिकाऱ्यांना सचित्र दर्शन घडविले. आर्थिक नुकसानभरपाई न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मच्छीमारांनी सिंगापूर बंदर प्रशासनाला दिला. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी तसेच इतर नेते उपस्थित होते. (वार्ताहर)