हुंडा विरोधासाठी गोंधळी समाजाची सोशल चळवळ

By Admin | Published: June 29, 2016 07:38 PM2016-06-29T19:38:52+5:302016-06-29T20:21:10+5:30

सोशल मीडिया चुुकीच्या हातात पडले तर कसा विध्वंस होऊ शकतो हे आपण वेळोवेळी बघतच आहोत. पण या माध्यमाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचे सोनेही होऊ शकते याचा

Gondhali society social movement | हुंडा विरोधासाठी गोंधळी समाजाची सोशल चळवळ

हुंडा विरोधासाठी गोंधळी समाजाची सोशल चळवळ

googlenewsNext

सतीश डोंगरे, नाशिक
सोशल मीडिया चुुकीच्या हातात पडले तर कसा विध्वंस होऊ शकतो हे आपण वेळोवेळी बघतच आहोत. पण या माध्यमाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचे सोनेही होऊ शकते याचा जणू काही आदर्शच गोंधळी समाजाने घालून दिला आहे. हुंड्यासारख्या अनिष्ट पद्धतीला विरोध करण्यासाठी समाजातील समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘व्हॉट्स अ‍ॅप आणि हाईक’वर ग्रुप तयार करून या विरोधात चळवळ उभी केली आहे. या ग्रुपमध्ये राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील समाजातील लोक सदस्य आहेत.
वास्तविक गोंधळी समाजात पूर्वीपासूनच हुंडा पद्धतीला प्राधान्य दिले जाते. अलीकडच्या काळात यात काहीसा बदल झाला असून, हुंडा ‘नवऱ्या मुलाला महागड्या वस्तूच्या स्वरूपात किंवा वधूकडच्या लोकांनी दोन्ही बाजूचे लग्न धुमधडाक्यात लावून द्यावे’ या अटीवर घेतला जातो; मात्र यामुळे वधूकडील मंडळींवर येणारा आर्थिक ताण हा असह्य असतो. यासर्व बाबींचा सारासार विचार करून नाशिकमधील विजय रेणुके यांनी सोशल मीडियावर हुंडाविरोधी चळवळ उभारण्याचे ठरविले. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर ‘शुभमंगल गोंधळी’ या नावाने गु्रप तयार केला.

                                            

ग्रुपच्या माध्यमातून इच्छित वधू-वर शोधले जाऊ लागले; मात्र त्याचबरोबर हुंडाविरोधी सूरही उमटू लागला. पुढे हुंड्याला पाठबळ देणारे अन् हुंड्याला विरोध करणारे असे दोन गट समोर आले. परंतु हुंड्यामुळे होणारे दूरगामी परिणाम बघता हुंड्याला पाठबळ देणारी मंडळी काही दिवसांमध्येच हुंडाविरोधी झाली. त्यानंतर ग्रुपचे नाव ‘हुंडा विरोधी वधू-वर (गोंधळी)’ असे ठेवण्यात आले.
ग्रुपमधील सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ‘हाईक’ या सोशल माध्यमावर हा ग्रुप सध्या चालविला जात आहे. ग्रुपमध्ये वधू-वरांचा सहभाग अधिक असून समाजात व्यापक जनजागृती करण्याचे काम केले जात आहे.

गु्रपमध्ये २६० सदस्य
‘हुंडाविरोधी वधू-वर ग्रुप (गोंधळी)’ या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील तब्बल २६० सदस्य आहेत. यामध्ये समाजातील तरुण-तरुणी सदस्य आहेत. त्याचबरोबर २० टक्के पालकांचादेखील समावेश आहे. ही सर्व मंडळी ‘हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही’ या तत्त्वाप्रमाणे ग्रुपमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून हुंडाविरोधी चळवळ चालविली जात आहे.

‘हुंडाविरोधी वधू-वर (गोंधळी)’ या ग्रुपमुळे समाजात हुंडाविरोधी गट निर्माण झाला आहे. हुंड्यामुळे होणारे दुष्परिणाम एकमेकांना शेअर केले जात असल्याने लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती होत आहे. त्यातच ग्रुपमध्ये सदस्यांची संख्या वाढतच असल्याने समाजातील लोक हुंडा या पद्धतीला कडाडून विरोध करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.
- विजय रेणुके, ग्रुप अ‍ॅडमिन

Web Title: Gondhali society social movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.