गोंदिया ७.५, मुंबई २० अंश; उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मुंबईच्या तापमानात घट होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:07 AM2020-01-13T03:07:13+5:302020-01-13T06:38:06+5:30
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.
मुंबई : राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ७.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान २० अंश नोंदविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मुंबईच्या किमान तापमानात वाढ होत असली, तरी सोमवारी उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मुंबईच्या तापमानात घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
१३ ते १६ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. सोमवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १९ अंशांच्या आसपास राहील. मंगळवारी आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, १८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.