गोंंदिया, भंडारा जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची मुसंडी
By admin | Published: July 7, 2015 02:18 AM2015-07-07T02:18:08+5:302015-07-07T02:18:08+5:30
गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.
गोंदिया/ भंडारा : गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून, भाजपाचा पुरता सफाया केला आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूण ५३ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक २०, भाजपाला १७ तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या आहेत. २०१० च्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला ७ तर काँग्रेसला ६ जागा जास्त मिळाल्या असून,भाजपाला १० जागा गमवाव्या लागल्या.
जिल्ह्णात चारपैकी भाजपाचे तीन आमदार व एक खासदार असताना अवघ्या ७ महिन्यांत जिल्ह्णातील मतदारांनी भाजपा उमेदवारांना नाकारणे हा त्यांच्यासाठी चिंतनाचा विषय झाला आहे.
भंडारा जिल्ह्णातील आठपैकी अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी आणि गोरेगाव या पंचायत समित्यांवर वर्चस्व कायम राखण्यात भाजपाला यश आले आहे. मात्र यापैकी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीत भाजपला ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ आणि काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. भंडारा, पवनी, लाखांदूर व लाखनी पंचायत समितीत काँग्रेसने बाजी मारली आहे. तुमसर, साकोली, मोहाडीत भाजपाने गड राखला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
---------
आमदारांच्या सौभाग्यवतीचा पराभव
आमगाव-देवरीतील भाजपाचे आमदार संजय पुराम यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या मावळत्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांचा काँग्रेसच्या उषा शहारे यांनी २९९ मतांनी त्यांचा पराभव केला़
----------
भाजपाच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून मतदारांनी जो जनाधार दिला त्याचा आम्ही कधीही अवमान करणार नाही. भाजपाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या भाजपाच्या षडयंत्राला जनतेने धडा शिकविला आहे.
- विजय वडेट्टीवार,उपनेते, विधानसभा
----------
शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा परिणाम भाजपाला दोन्ही जिल्ह्णांमध्ये भोगावा लागला. लोकसभा निवडणुकीत जरी बदल घडून आला असला तरी आपण केलेल्या विकास कामांची जाण आता मतदारांना होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी भाजपाला नाकारत हा कौल दिला आहे. - खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
-----------
वर्तमान स्थितीत मतदार राजाने दिलेल्या जनाधाराचा आम्ही सन्मान करतो. भाजपाला कमी जागा का मिळाल्या यावर चिंतन केले जाईल. - राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री.