धक्कादायक! पेट्रोल पंपावर चक्क पेट्रोलऐवजी पाण्याची विक्री, वाहनं बंद पडली अन् बिंग फुटलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 05:39 PM2022-08-12T17:39:20+5:302022-08-12T17:40:05+5:30

पेट्रोलचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना सर्वसामान्यांना खिशाला कात्री लावावी लागत आहे. त्यात आता थेट पेट्रोल पंपावरच वाहनधारकांच्या वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी चक्क पाणी भरण्यात येत असल्याचा प्रताप उघडकीस आला आहे.

gondia news selling water instead of petrol at the petrol pump vehicles stopped working | धक्कादायक! पेट्रोल पंपावर चक्क पेट्रोलऐवजी पाण्याची विक्री, वाहनं बंद पडली अन् बिंग फुटलं!

धक्कादायक! पेट्रोल पंपावर चक्क पेट्रोलऐवजी पाण्याची विक्री, वाहनं बंद पडली अन् बिंग फुटलं!

googlenewsNext

गोदिंया- 

पेट्रोलचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना सर्वसामान्यांना खिशाला कात्री लावावी लागत आहे. त्यात आता थेट पेट्रोल पंपावरच वाहनधारकांच्या वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी चक्क पाणी भरण्यात येत असल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव शहरातील रिया फ्युएल स्टेशन नावाने असलेल्या एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास वाहनचालकांनी पेट्रोल भरुन वाहन चालवले पण काही अंतरावर गेल्यानंतर वाहनं बंद पडली. वाहनचालकांना सुरुवातीला काही कळलं नाही. पण जेव्हा मॅकेनिककडे तपासणी केली गेली तेव्हा पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल नसून पाणी असल्याचं उघडकीस आलं आणि गहजब झाला. 

वाहनाच्या इंधन टाकीत पेट्रोलऐवजी पाणी टाकलं गेल्याचं ज्या ज्या वाहन धारकांना लक्षात आलं त्या सर्वांनी पेट्रोल पंपावर धाव घेतली. या सर्वांनी पेट्रोल पंपावर विक्री होत असलेल्या पेट्रोलची पडताळणी केली तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे तक्रार करुनही पेट्रोल पंपाकडून पेट्रोलची विक्री सुरूच होती. अखेर आमगावचे तहसीलदार आणि एस्सार कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांनी तक्रारी केल्यानंतर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन पंप बंद केला आहे. 

वाहन धारकांना मोठा फटका
पेट्रोल पंपावर ११५ रुपये प्रतिलीटर दरानं पेट्रोलऐवजी चक्क पाणी वाहनांच्या टाकीत दिलं जात होतं. यात वाहनधारकांचं नुकसान तर झालंच. पण वाहनं बंद पडल्यानं मोठा फटका बसला आहे. आता बिघडलेल्या वाहनांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

रिया फ्युएल स्टेशनवर पाणीमिश्रीत पेट्रोलची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. पेट्रोलची तपासणी होत असल्याची माहिती पेट्रोल पंपावरील सेल्स अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तोवर पेट्रोल पंपावर वाहनांना पेट्रोल देण्यास मनाई करण्यात आली आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती तहसील अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

Web Title: gondia news selling water instead of petrol at the petrol pump vehicles stopped working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.