पायाभूत सुविधांना ‘अच्छे दिन’
By admin | Published: February 5, 2017 04:10 AM2017-02-05T04:10:35+5:302017-02-05T04:10:35+5:30
सरकारने दोन वर्षांपासून पायाभूत सेवासुविधा विकसित भरण्यावर अधिक भर दिला आहे. त्याचे परिणाम दीर्घकालीन असून त्यामुळे भविष्यात अच्छे दिन येतील, असे मत एमईपी
- अमोद काटदरे, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)
सरकारने दोन वर्षांपासून पायाभूत सेवासुविधा विकसित भरण्यावर अधिक भर दिला आहे. त्याचे परिणाम दीर्घकालीन असून त्यामुळे भविष्यात अच्छे दिन येतील, असे मत एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष जयंत म्हैसकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील शं.ना. नवरे सभामंडपात म्हैसकर यांची प्रकट मुलाखत निवेदक अरविंद विंझे आणि शैलेश पेठे यांनी घेतली. त्या वेळी म्हैसकर बोलत होते. ते म्हणाले की, रस्ते हा पायाभूत सुविधांचा कणा आहे. देशभर रस्त्यांचे सक्षम जाळे विणून चांगली कनेक्टिव्हिटी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परदेशांतील रस्त्यांच्या धर्तीवर येथे रस्ते विकसित केले जाऊ शकतात. रस्त्यांच्या देखभालीसाठी सरकारने पथकर आकारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्रचंड नाराजी व्यक्त केली. मात्र, चांगली सेवा दिली की, ते पथकर भरण्यासाठी हात आखडता घेत नाहीत.
ते पुढे म्हणाले की, माझे शालेय शिक्षण डोंबिवलीत झाले. शाळा ही आपल्या आयुष्याची सुरुवात आहे. ही आपल्याला घडवते. आपला अर्धा वेळ शाळेत जातो. शाळेत जे शिकाल, त्याचा भविष्यात फायदा होतो. त्यामुळे अधिक लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
व्यवसायाचे बाळकडू वडील दत्तात्रेय म्हैसकर यांच्याकडूनच मिळाले. व्यवसाय करण्याचे माझेही ठरलेले होते. मात्र, कोणता ते निश्चित नव्हते. वडिलांकडून ५० हजारांचे भांडवल घेऊन व्हिडीओ कॅसेटचा व्यवसाय केला. त्यातून मिळालेला नफा त्यांना परत केला.
वडिलांची आयडियल रोड बिल्डर्स ही कंपनी असतानाही २००२ मध्ये एमईपीची स्थापना केली. रस्ते विकास आणि देखभाल, या नवीन संकल्पनेमुळे सुरुवातीला बँकांकडून कर्ज मिळताना अडचणी आल्या. २०१० हे वर्ष या कंपनीसाठी टर्निंग पॉइंट ठरले.