गूळ उत्पादकांसाठी यंदा ‘अच्छे दिन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 02:18 AM2016-10-16T02:18:09+5:302016-10-16T02:18:09+5:30
उसाची कमतरता, साखरेचे वाढलेले दर व गुजरात मार्केटमधील मागणीच्या पार्श्वभूमीवर यंदा गूळ उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार आहेत. कोल्ड स्टोरेजमधील
- राजाराम लोंढे, कोल्हापूर
उसाची कमतरता, साखरेचे वाढलेले दर व गुजरात मार्केटमधील मागणीच्या पार्श्वभूमीवर यंदा गूळ उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार आहेत. कोल्ड स्टोरेजमधील ‘एक नंबर’च्या गुळाला सध्या ५००० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. नवीन गुळालाही ५१०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
कोल्हापूरला ‘गुळाची बाजारपेठ’ म्हणून ओळखले जाते, पण गेल्या काही वर्षांपासून अनिश्चित दरामुळे ही बाजारपेठ अडचणीत आली आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी जिल्ह्यात एक हजाराहून अधिक गुऱ्हाळघरे सुरू होती, पण मजुरांचा प्रश्न, गूळ दर, साखर कारखान्यांची वाढलेली उचल, यामुळे चारशेच्या आसपास गुऱ्हाळघरे राहिली आहेत.
गेल्या वर्षी गुळाचा दर एकदम खाली आला होता. त्यात साखर १९ रुपयांपर्यंत खाली घसरल्याने, गूळ उत्पादकांचे हाल झाले. प्रतिक्विंटल २४०० पासून ३२०० रुपयांपर्यंत गुळाचा दर राहिल्याने शेतकऱ्यांनी ऊस साखर कारखान्यांकडे पाठविणे पसंत केले. त्यामुळे जानेवारीनंतर गुऱ्हाळघरांची धुरांडी थंडावली. यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका ऊस पिकाला बसला. त्यानंतर, धुवॉँधार पावसाने यंदा नद्यांना दोन वेळा पूर आला. परिणामी, नदीकाठचे ऊस अडचणीत आले आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुऱ्हाळघरांकडे येणाऱ्या उसात किमान २५ टक्के घट होणार आहे.
गुजरातमध्ये सध्या गुळाला चांगला दर असून दिवाळीनंतरही तो कायम राहण्याची शक्यता आहे.
- बाळासाहेब मनाडे (माजी अध्यक्ष, शाहूपुरी मर्चंट असो., कोल्हापूर )