पर्यटनाला येणार ‘अच्छे दिन’
By admin | Published: September 28, 2016 02:34 AM2016-09-28T02:34:03+5:302016-09-28T02:34:03+5:30
महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे अनेक प्रकल्प आणि योजना आखण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यानंतर
मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे अनेक प्रकल्प आणि योजना आखण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यानंतर पर्यटन व्यवसायातही वृद्धी झाली आहे. त्यामुळे आता पर्यटन क्षेत्राचे रूपडे पालटून महाराष्ट्राच्या पर्यटनालाही ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत आहेत.
पर्यटन व्यवसायाची नवी मुहूर्तमेढ रोवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आता बाह्या सरसावून पुढे आले आहे. जागतिक नकाशावरचा पर्यटन बिंदू म्हणून महाराष्ट्र लख्खपणे चमकवण्यासाठी, महामंडळाने ३ हजार कोटींचा पर्यटन विकासाचा आराखडा करण्याचे निश्चित केले आहे. २०१५ साली भारतात येणाऱ्या पर्यटकांपैकी ४४ लाख ८ हजार ९१६ पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिल्याची नोंद आहे, तर आनंदाची बाब म्हणजे, पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र द्वितीय स्थानी आहे.शासनाच्या नवीन कोकण पर्यटन विकास धोरणामुळे कोकणात पर्यटन व्यवसायामध्ये मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण पर्यटन उद्योग संघाचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
...तर मोदीच ‘अतुल्य’ भारतचा चेहरा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यांमुळे पर्यटन क्षेत्रातील व्यवसायात वृद्धी झाली आहे. परदेशातील विविध देश-शहरांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणांमुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याने, भारताच्या पर्यटनाला चालना मिळाली. केंद्र सरकारचे पर्यटन खाते पंतप्रधान मोदी यांनाच पर्यटन क्षेत्राचे ब्रँड अॅम्बेसेडर करण्याची शक्यता आहे.
देश असो वा राज्य आपल्याकडे पर्यटन विकास समृद्ध करण्यासाठी सर्व प्रकारची संपत्ती आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेऊन कृतिशील योजना राबविल्या पाहिजेत, तसेच पर्यटन विभागाशी निगडित इतर विभागांनी या खात्याशी समन्वय राखला पाहिजे. शिवाय, नवे तंत्रज्ञान, सोशल मीडिया अशा नव्या माध्यमांचा विकास करून पर्यटनाला हायटेक बनविले पाहिजे.
- उमाकांत तासगावकर,
पर्यटनतज्ज्ञ