मनपा शाळांना ‘अच्छे दिन’....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 01:37 AM2017-03-30T01:37:40+5:302017-03-30T01:37:54+5:30
पहिलीला हाऊसफुल्ल प्रवेश : पालकांचा विश्वास वाढला
यशवंत गव्हाणे ---कोल्हापूर --महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेकडे कायम नाक मुरडणारे पालक आज कोल्हापूर शहरातील मनपा शाळेत आपल्या पाल्यास पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून रांगेत उभे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शाळांच्या गुणवत्तेमुळे शहरातील सर्व मनपा शाळा मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हाऊसफुल्ल झाल्या.
महापालिकेची शाळा म्हटली की नको रे बाबा... अशीच काही मानसिकता काही वर्षांपूर्वी पालकांची झाली होती. त्यामुळे या शाळांना उतरती कळा लागली होती. शाळेतील पटसंख्या पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना पालकांच्या दारोदारी फिरावे लागत असे. तरी पालक पाल्यांना या शाळेत घालण्यास तयार होत नव्हते. परंतु, मनपा शाळेतील अनेक प्रशासनाने यात आमूलाग्र बदल करीत शिक्षणाचा दर्जा उंचावला. त्यातच ई-लर्निंगस, शाळाअंतर्गत फिल्म फेस्टिव्हलसारखे उपक्रम राबवून नव्या तंत्रज्ञानाची कास धरली आणि वेळोवेळी बदल करीत आज या शाळा आपले अस्तित्व टिकवून ठेवत आहेत. ही बाब खरंच कौतुकास्पद आहे.
शहरात सध्या महापालिकेच्या ५९ शाळा आहेत. यामध्ये जवळपास ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील ४२ शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत, तर १८ शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण दिले जाते, तर ३६० शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यापैकी नेहरूनगर, टेंबलाईवाडी, फुलेवाडी, जरगनगर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, उर्दू मराठी शाळा, साने गुरुजी वसाहत, हिंद विद्यामंदिर येथील शाळांमध्ये प्रवेशासाठी अक्षरश: झुंबड उडत आहे.
मनपा शाळेत मिळते शिष्यवृत्ती
महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेने शिष्यवृत्ती सुरू केली आहे. यासाठी मनपा दरवर्षी एक शिष्यवृत्ती परीक्षा घेते. यातील टॉप २५ विद्यार्थ्यांना २४०० रुपयेप्रमाणे तीन वर्षे म्हणजे ७२०० रुपये शिष्यवृत्ती पाचवी ते सातवी दरम्यान मिळते. राज्यात अशी शिष्यवृत्ती देणारी बहुधा ही पहिलीच महापालिका आहे.
हॅप्पी स्कूल... हॅप्पी स्टुडंट
महापालिकेच्या शाळेत जर तुम्ही सहज गेलात तर तुम्हास शाळेच्या सर्व भिंती बोलक्या दिसतात. त्यावर त्या विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडणी केली आहे. याची सुरुवात नेहरूनगर शाळेत झाली होती. याची बातमी १ जानेवारी २०१४ ला ‘लोकमत’मध्ये राज्यभर सर्व आवृत्त्यांमध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. मनपाच्या जवळपास सर्व शाळांमध्ये ‘हॅप्पी स्कूल... हॅप्पी स्टुडंट’ हा उपक्रम राबविला जातो.
शाळांची प्रवेशाची आकडेवारी
शाळा पट प्रवेश
नेहरूनगर विद्यामंदिर८०६०
जरगनगर१८६१७५
महात्मा फुले, फुलेवाडी६४६०
कर्मवीर भाऊराव पाटील३१३०
प्रिन्स शिवाजी जाधववाडी६१६०
टेंबलाईवाडी विद्यामंदिर६३६०
जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शाळासिद्धीसारखे उपक्रम राबविले जातात. यातून भौतिक सुविधा पुरविण्यासोबतच गुणवत्तेबाबतही विशेष लक्ष दिले गेले.
- प्रतिभा सुर्वे, प्रभारी प्रशासनाधिकारी, प्रा. शि. स.
पट वाढीमागची कारणे
कृतियुक्त अध्यापन पद्धती व तंत्रज्ञानामुळे अध्यापनात आलेली रंजकता
प्रशासनाने पूर्णवेळ दिलेले शैक्षणिक पर्यवेक्षक, गुणवत्तेत वाढ
प्रशासनाधिकारी व पदाधिकारी यांचे शिक्षकांना मिळणारे प्रोत्साहन
यंदा प्रथमच शहरस्तरीय मध्यवर्ती क्रीडास्पर्धांचे आयोजन
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना तब्बल २४०० रुपयांची शिष्यवृत्ती
शिक्षक, पत्रकार, पोलिस, इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे प्राधान्य
समविचारी शिक्षकांची व्हॉट्स अॅपच्या माध्यमांतून होणारी ज्ञानाची देवाण-घेवाण