वाजपेयींच्या जन्मदिनी होणार गुड गव्हर्नन्स डे
By admin | Published: December 22, 2014 03:46 AM2014-12-22T03:46:33+5:302014-12-22T03:46:33+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या २५ डिसेंबर या जन्मदिनी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये गुड गव्हर्नन्स डे
मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या २५ डिसेंबर या जन्मदिनी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये गुड गव्हर्नन्स डे साजरा करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना दिले आहेत. परंतु महाविद्यालयांना नाताळ सुटी असल्याने हा डे अपयशी ठरण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी तंत्रज्ञान आणि प्रयोगशील उपक्रम राबवत चांगले प्रशासन निर्माण करावे, यासाठी २५ डिसेंबर रोजी विद्यापीठांमध्ये गुड गव्हर्नन्स डे साजरा करण्याचे आदेश यूजीसीने नुकतेच विद्यापीठांना दिले आहेत. २५ डिसेंबर रोजी महाविद्यालयांना सुटी असल्याने हा दिवस अपयशी ठरण्याची शक्यता आहे. या डेचा नाताळ सुटीमध्ये अडथळा ठरू नये, यासाठी यूजीसीने सुटीनंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये हा डे साजरा करण्याचे आदेश आहेत. परंतु सध्या महाविद्यालयांचे महोत्सव सुरू असल्याने नाताळ सुटीनंतर हा कार्यक्रम होण्याची शक्यता कमी आहे. या दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी यूजीसीने तीन बक्षिसांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बक्षिसे विद्यापीठांच्या निधीतून देण्यात यावीत, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)