यंदा चांगला मान्सून !
By admin | Published: February 10, 2016 02:30 AM2016-02-10T02:30:32+5:302016-02-10T02:30:32+5:30
दोन वर्षांपासून सातत्याने पडलेल्या दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या बळीराजासाठी खुशखबर आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे चांगला पाऊस घेऊन येणार आहेत. मोसमी वारे तयार होण्यासाठी
पुणे : दोन वर्षांपासून सातत्याने पडलेल्या दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या बळीराजासाठी खुशखबर आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे चांगला पाऊस घेऊन येणार आहेत. मोसमी वारे तयार होण्यासाठी आतापर्यंतची हवामानाची स्थिती आदर्श आहे. ती मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातही कायम राहिल्यास यंदा महाराष्ट्रासह देशात वेळेच्या आधी मान्सून दाखल होईल आणि विशेष म्हणजे तो समाधानकारक असेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
डॉ. साबळे म्हणाले, २०१४ आणि २०१५ या वर्षात आॅगस्ट ते डिसेंबर काळात ४ ते ५ चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यानंतर गारपीट झाली होती. या सर्व गोष्टी मान्सूनला मारक होत्या. त्याचा मोसमी वाऱ्यांच्या निर्मितीवर आणि प्रवासावर विपरित परिणाम झाल्याने पावसाचे प्रमाण अल्प राहिले.
यंदा आॅगस्ट ते डिसेंबरच नव्हे तर जानेवारी महिन्यात सुद्धा एकही
चक्र ीवादळ किंवा गारपीट झालेली नाही. उपरोक्त काळातील हवामान
हे आदर्श असून ते मान्सूनचे
वारे निर्माण होण्यासाठी उपयुक्त आहे.
२००६ मध्ये अशीच स्थिती होती, तेव्हा महाराष्ट्रात तब्बल १०-१२ दिवस अगोदरच मान्सून दाखल झाला होता आणि पाऊसही समाधानकारक पडला होता. २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये आॅगस्ट ते डिसेंबर महिन्यात चक्रीवादळ, गारपीट झाली होती. त्याचा मान्सूनवर परिणाम होऊन जून आणि जुलै महिन्यात पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले. यंदा
स्थिती चांगली असल्याने जून व जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरिपाची
पिके बहरतील, अशी माहिती साबळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
उन्हाळा १५ दिवस अगोदरच
यंदा उन्हाळा लवकर सुरू होण्यासाठी अनुकुल स्थिती आहे. पाच-सहा दिवसांपासून राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. ही स्थिती कायम राहत असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील काळात तापमानात वाढ होऊ शकते. त्यामुळे यंदा उन्हाळा ८ ते १५ दिवस अगोदरच सुरू होण्याची शक्यता आहे, असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला.