खूशखबर : राज्यात येणार नवे ५५ हजार रोजगार; महिंद्रा बडी कंपनी उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:47 AM2022-12-14T06:47:26+5:302022-12-14T06:48:23+5:30
विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागांत ७० हजार कोटींचे प्रकल्प; नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये २० हजार कोटींचा स्टील प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे सुमारे ५५ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागांतील औद्योगिक विकासाला चालना देण्याऱ्या उद्योगांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
मंत्रालयात मंगळवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.
नक्षलग्रस्त भागांत ३ प्रकल्प
n गडचिरोली व चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३ मोठे प्रकल्प उभारण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे. यात चंद्रपूर येथे २० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. हरित तंत्रज्ञानावर आधारीत न्युईरा क्लिनटेक सोल्युशन्सच्या कोल गॅसिफिकेशन प्रकल्पाचा त्यात समावेश आहे.
n गडचिरोलीत लॉयड मेटल्स एनर्जी या कंपनीचा स्टील निर्मितीचा प्रकल्प उभारण्यास व एकूण २० हजार कोटी गुंतवणूक करण्यास मान्यता दिली. वरद फेरो अलॉय कंपनीच्या १५२० कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.
वस्त्रोद्योगास विदर्भात चालना
अमरावती व नागपूर विभागात वस्त्रोद्योग वाढीस चालना मिळावी यासाठी इंडोरामा कंपनीच्या उपकंपन्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करता यावी यासाठी त्यांच्या २५०० कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे अमरावती व नागपूर हे वस्त्रोद्योगामध्ये मोठी क्षेत्रे म्हणून उदयास येतील.
इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीचा पहिला प्रकल्प
देशाच्या व राज्याच्या इलेक्ट्रॉनिक व्हेईकल पॉलिसीनुसार देशातील इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीच्या क्षेत्रातील दहा हजार कोटींची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटोमोबाईल्सचा पहिला प्रकल्प पुणे येथे सुरू होणार आहे. या माध्यमातून राज्यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्पांमध्ये विदेशी गुंतवणूक होणार असून व्होक्सवॅगनबरोबर पुणे इथे तंत्रज्ञान, संशोधन व विकास संदर्भात प्रोटोटाइप बनविण्यात येणार आहे.
बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनी पुणे जिल्ह्यामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारीत फार्मास्युटिकल ग्लास टयूबिंगचे उत्पादन करणार आहे. यासाठी ही कंपनी दोन टप्प्यात १६५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २००० लोकांना रोजगार मिळणार आहे.