आनंदाची बातमी; ६ जूनला मान्सून केरळात धडकण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 03:13 AM2019-06-01T03:13:40+5:302019-06-01T06:16:27+5:30
मान्सूनसाठीचे पोषक वातावरण तयार झाल्यानंतर, तो पुढील आठवड्यात म्यानमार आणि श्रीलंकेत दाखल होईल आणि ६ जून रोजी केरळात धडकेल
मुंबई : यंदा मान्सूनचे उशिरा आगमन होणार असल्याचा हवामान खात्याने यापूर्वी अंदाज व्यक्त केला असला, तरी अंदमानात रेंगाळलेल्या मान्सूनच्या पुढील प्रवासाबाबत हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. मान्सून केरळात स्थिर होण्यासाठीचे अनुकूल वातावरण पुढील तीन दिवसांत तयार होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
मान्सूनसाठीचे पोषक वातावरण तयार झाल्यानंतर, तो पुढील आठवड्यात म्यानमार आणि श्रीलंकेत दाखल होईल आणि ६ जून रोजी केरळात धडकेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे, तसेच मान्सून सरासरीच्या ९६ टक्के पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
‘येथे’ पावसाची शक्यता
१ जून रोजी कोकण, गोवा, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २ जून रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ३ जूनला कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ४ जूनला कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.