‘लॉकडाऊन’मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या; पश्चिम विदर्भाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 04:46 PM2020-07-09T16:46:08+5:302020-07-09T16:46:43+5:30
दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न यासारख्या अनेक विवंचणेमुळे विदर्भातील शेतकरी मृत्यूचा फास जवळ करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
गजानन मोहोड
अमरावती : ‘लॉकडाऊन’च्या काळात मार्च ते जून या महिन्यात पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रकरणात गतवर्षीच्या तुलनेत ५५ ने कमी आलेली आहे. हा दिलासा मानला जात आहे. लॉकडाऊनपूर्वीच्या काळात शासनाने कर्जमुक्तीसह अनेक प्रकारे शेतकऱ्यांना मदत दिली. त्यामुळे शेतकरी सावरायला मदत झाल्याचा प्रशासनाचा सूर आहे.
लॉकडाऊनच्या काळात शेतकरी आत्महत्या कमी झाल्यात, ही सकारात्मक बाब आहे. वास्तविकत: या काळात अडचणी वाढल्या होत्या. याच्या खोलात जाऊन कारणांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल मागविणार असल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी सांगितले. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न यासारख्या अनेक विवंचणेमुळे विदर्भातील शेतकरी मृत्यूचा फास जवळ करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. पश्चिम विदर्भात अलीकडच्या काळापर्यंत दर सहा ते आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे शासनाच्या अहवालावरून स्पष्ट होते. यंदा जानेवारी जून या सहा महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह नागपूर विभागातील वर्धा अशा सहा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यात ४७१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. मार्च ते जून असे चार महिने ‘लॉकडाऊन’चे गृहीत धरता या कालावधीत २७१ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. मागील वर्षी या चार महिण्यात ३२६ शेतकºयांच्या झाल्या होत्या.
पश्चिम विदर्भात १ जानेवारी २००१ पासून १ जून २०२० पर्यत १७ हजार ५०८ शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ८ हजार १ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली ९ हजार २२९ अपात्र ठरलेली आहेत. अद्यापही २७८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा अहवाल आहे.
शेतकरी आत्महत्यांची स्थिती
महिना २०२० २०१९
मार्च ६० ८२
एप्रिल ५१ ७१
मे १०८ ९२
जून ५२ ८२
एकूण २७१ ३२६
शेतकरी आत्महत्यांमध्ये आलेली हा निश्चित दिलासा आहे. मात्र, यामागे लॉकडाऊनचे कारण नाही तर त्यापूर्वी शासनाची कर्जमुक्ती योजना, पिकांचे नुकसानीसाठी देण्यात आलेली मदत व विविध योजनांद्वारे शेतकºयांना मदत देखील महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल मागविला आहे.
- पीयूष सिंग,
विभागीय आयुक्त, अमरावती
या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये कमी आली असली तरी शेतकºयांवरील संकट निस्तरलेले नाही. सद्यस्थितीत दुबार पेरणी ओढावलेली आहे. शेतकºयांचा कापूस घरी पडून आहे. नाफेडचे चुकारे झालेले नाही, पीककर्ज वाटपाचा त्रागा कायम आहे.
- किशोर तिवारी,
अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन