ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी: जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 03:39 PM2024-09-06T15:39:59+5:302024-09-06T15:40:08+5:30
राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते.
Chandrakant Patil : सन २०२४-२५ या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत. याबाबत विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) प्रवर्गाप्रमाणेच इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गातील उमेदवारांकरिता ही मुदत देण्यात आली आहे, असंही मंत्री पाटील यांनी सांगितलं.
सदर प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता, प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे. सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहतील. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.