ज्येष्ठ नागरिक गणेश भक्तांसाठी खुशखबर! पर्यटन विभागातर्फे 'गणपती दर्शन यात्रा'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 10:28 PM2022-09-01T22:28:38+5:302022-09-01T22:29:09+5:30
कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर जल्लोषात साजरा होतोय गणेशोत्सव
मुंबई: विश्वातील सर्वात मोठा गणेशोत्सव सोहळा महाराष्ट्र राज्यात साजरा होतो. महाराष्ट्र राज्याचा पर्यटन विभाग व स्थानिक महापालिकांनी संयुक्तपणे मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर या महानगरांतील वय वर्षे ६० वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या औचित्याने गणपती दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा समजला जातो. राज्यभरातील गणेशोत्सव मंडळे आपापल्या परिसरात नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम इत्यादी माध्यमातून अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करतात. कोरोना महामारीदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यावर देखील स्वाभाविक मर्यादा आल्या होत्या. परंतु दोन वर्षांनंतर प्रथमच राज्यभरात मोठ्या उत्साहात व निर्बंधरहित वातावरणात गणेशोत्सवाचे आयोजन होत आहे.
संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असतानाच राज्याच्या पर्यटन विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शहरांतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेश मंदिरांची यात्रा घडविली जाईल. यासाठी बृहन्मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर महानगरपालिकेने वातानुकूलित बसेस, आरोग्यसेवक, गाईड व न्याहारी अशा सुविधा दिल्या जातील. तसेच सर्व मंडळे व मंदिरात श्री गणपती दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जाईल. दिनांक ०१, ०२, ०५, ०६ व ०७ सप्टेंबर २०२२ या पाच दिवशी ही यात्रा आयोजित करण्यात येणार आहे.
या योजनेचा जास्तीत जास्त लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा व गणेशोत्सवाच्या मंगलकाळात श्री गणपती दर्शन घ्यावे, असे आवाहन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी नागरिकांनी मुंबईतील सुहास (7738694117) आणि अजिंक्य (8779898001), ठाण्यातील प्रशांत (9029581601) आणि कल्याणी (7030780802), पु्ण्यातील अजय (7887399217) आणि पुजारी (8888363647) तर नागपूरमध्ये पंकज (9665852021) आणि रजनी (9764481913) या पर्यटन महासंचालनालयाच्या खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.