गुड न्यूज ! यंदा पाऊस धो धो बरसणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 04:52 AM2020-06-02T04:52:22+5:302020-06-02T04:52:41+5:30
मान्सून अचूक मुहूर्तावर केरळात; आठ दिवसांत येणार महाराष्ट्रात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: संपूर्ण देश चातकासारखी वाट पाहात असलेला नैऋत्य मान्सून ठरल्या मुहूर्तावर अचूकपणे केरळमध्ये दाखल झाला. एवढेच नव्हे तर सात वर्षांनी प्रथमच वेळेवर आलेला हा पाऊस यंदा सप्टेंबरपर्यंत नेहमीपेक्षा जरा जास्तच धो धो बरसेल, अशी दुहेरी आनंदवार्ता हवामान खात्याने सोमवारी जाहीर केली. पुढील आठ ते १० दिवसांत पाऊस महाराष्ट्रात हजेरी लावेल, अशी अपेक्षा आहे.
केंद्रीय भूविज्ञान खात्याचे सचिव डॉ. एम. राजीवन आणि भारतीय हवामान खात्याचे माहासंचालक डॉ. एम. मोहपात्र यांनी एका पत्रकार परिषदेत मान्सूनचे आगमन जाहीर करण्याखेरीज यंदाच्या पावसाचा दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाजही घोषित केला. केरळच्या सर्वात दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये गेले तीन दिवस जोरदार पाऊस सुरु होता. पण केरळ किनाºयाजवळ अरबी समुद्रात तयार झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा हे त्याचे प्रमुख कारण होते. त्याच चिंब वातवरणात नैऋत्य मान्सूननेही सोमवारी सकाळी केरळमध्ये प्रवेश केला, असे हवामान खात्याने सांगितले.
मान्सूनचा लहरीपणा : यंदाचे वर्ष धरून हा लहरी मान्सून गेल्या १० वर्षात फक्त दोनदा १ जून या अपेक्षित तारखेला केरळमध्ये दाखल झाला आहे. २०१०, १०१७ व २०१८ या वर्षी त्याने तीन-चार दिवस आधीच हजेरी लावली होती. तर इतर वर्षी तो एक ते सात दिवसांनी रेंगाळला होता.