सुखद वार्ता! बळीराजाची प्रतिक्षा संपणार; राज्यात पुढील ४ दिवस चांगला बरसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 06:54 AM2023-07-14T06:54:57+5:302023-07-14T06:55:15+5:30
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
मुंबई : पेरणी करून ढगांकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला हवामान विभागाने आता पुन्हा एकदा सुखद वार्ता दिली आहे. पुढील आठ दिवसात कमी-अधिक फरकाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी १४ ते १६ जुलै दरम्यान कोकण, मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. १४ ते २७ जुलै दरम्यान राज्यासह खान्देश भागात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत सरासरीपेक्षा चांगला पाऊस होईल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान बदलांमुळे राज्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात विविध ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असल्याचे माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.
पश्चिम विदर्भात तीन जण वाहून गेले
नदी-नाल्यांना पूर येऊन अकाेला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांतील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन जण वाहून गेले. त्यात ढोरपगाव (जि. बुलढाणा) गावातील सातवीत शिकणाऱ्या जय विठ्ठल तायडे (१३) याचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील नाल्यात विळेगाव येथील ज्ञानेश्वर सुभाष राठाेड (४०) वाहून गेले तर अकाेल्यात जियान अहमद इकबाल अहमद (१०) वाहून गेला.
३०० मेल, एक्स्प्रेस, ४०६ पॅसेंजर रद्द
नवी दिल्ली : पावसामुळे रेल्वेमार्गांमध्ये पाणी साचल्याने ७ जुलैपासून येत्या शनिवारपर्यंत ३०० मेल, एक्स्प्रेस ट्रेन व ४०६ पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. पावसामुळे ६०० मेल व ५०० पॅसेंजर ट्रेनच्या वाहतुकीला फटका बसला. त्यातील काही गाड्या रद्द करण्यात आल्या, काही दुसऱ्या मार्गावर वळविल्या.