कोकणवासीयांसाठी खूशखबर! तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 07:40 PM2019-11-07T19:40:43+5:302019-11-07T19:52:15+5:30
कोकण रेल्वे मार्गावरून खेड ते सावंतवाडीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने खूशखबर दिली आहे.
मुंबई - कोकण रेल्वे मार्गावरून खेड ते सावंतवाडीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वेवरून दादर ते सावंतवाडीदरम्यान धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यात कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या १५ वरून १९ एवढी करण्यात आली असून, ११ नोव्हेंबरपासून अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसला हे अतिरिक्त डबे जोडले जातील.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रहिवाशांसाठी सोईच्या ठरतील अशा मोजक्याच मेल/एस्क्प्रेस गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावत असल्याने या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांत वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत कोकण रेल्वे प्रशासनाने तुतारी एक्स्प्रेच्या डब्यांची संख्या १५ वरून १९ एवढी केली आहे.
११००३/डाऊन दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस आणि ११००४ अप सावंतवाडी/दादर एक्स्प्रेस या गाड्यांच्या डब्यांची सुधारित स्थिती पुढील प्रमाणे आहे. द्वितीय श्रेणी एसीचा एक डबा, तृतीय श्रेणी एसीचे दोन डबे, स्लीपर क्लासचे ८ डबे आणि जनरल क्लासचे ६, एसएलआर क्लासचे २ असे एकूण १९ डबे असतील. ११ नोव्हेंबरपासून डाऊन आणि अप मार्गावरील तुतारी एक्स्प्रेस सुधारित डब्यांच्या रचनेसह धावणार आहे.