खूशखबर...! मान्सून केरळच्या उंबरठ्यावर; श्रीलंकेत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 08:20 AM2019-06-04T08:20:00+5:302019-06-04T08:27:15+5:30
मान्सूनपूर्व पावसाने दडी मारली असून सरासरीपेक्षा 25 टक्के कमी पाऊस झाला आहे.
नवी दिल्ली : दुष्काळ आणि उकाड्याने देश हैराण झाला असून एक आनंदाची बातमी आली आहे. श्रीलंकेत मान्सून दाखल झाला असून येत्या दोन दिवसांत तो केरळमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
साधारणता 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होतो. मात्र, यंदा थोडासा उशिराने मान्सून आला असून 6 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. दक्षिण अरेबियन समुद्रात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे लक्ष्यद्वीपवरून पाऊस पुढे सरकत आहे. 8-10 जूनपर्यंत पाऊस कर्नाटक, पूर्व भारत व्यापणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.
दरम्यान मान्सूनपूर्व पावसाने दडी मारली असून सरासरीपेक्षा 25 टक्के कमी पाऊस झाला आहे. तर गेल्या 65 वर्षांतील निचांकी पाऊस झाल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. तसेच पुढील 48 तासांत मुंबई आणि आजुबाजुच्या परिसरात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे. मुंबईमध्येही ढगाळ वातावरण आहे.
श्रीलंकेच्या हवामान विभागाने सोमवारी रात्रीपासून मान्सूनने जोर पकडल्याचे जाहीर केले आहे.
अंदमानमध्ये २० मेच्या सुमारास मान्सून दाखल झाला. त्यामुळे ३० मे अखेरीस केरळात आणि पुढे राज्यात मान्सून दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, कोकण किनारपट्टी भागात मान्सूनची हजेरी यंदा लांबणार आहे. दरवर्षी साधारण ५ ते ७ जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊसयंदा १२ जूननंतर कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. या वेळी पावसाचा जोर असणार नाही. गेल्या वर्षी किनारपट्टी भागात २९ मे रोजीच मान्सून दाखल झाला होता.