GOOD NEWS: मान्सून गोव्यात दाखल
By admin | Published: June 8, 2017 03:13 PM2017-06-08T15:13:23+5:302017-06-08T17:18:43+5:30
पावसाची आतुरतेने वाट पाहणा-यांसाठी खुशखबर असून काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेरीस गोव्यात दाखल झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 8- गेल्या अनेक दिवसांपासून सगळेच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या तुरळक सरी सुरू झाल्या आहेत पण त्यामध्ये लोकांचं समाधान होत नाहीये. पण आता सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेरीस गोव्यात दाखल झाला आहे. राज्यात बुधवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर गुरुवारीसुद्धा पाऊस सुरू आहे. मान्सून 8 जून रोजी गोव्यात दाखल होइल, असा अंदाज स्कायमॅटने वर्तवला होता. स्कायमॅटचा हा अंदाज खरा ठरला आहे. 8 जूनचा मुहूर्त साधत मान्सूनने गोव्यात हजेरी लावली आहे.
खरंतर सर्वसाधारण वेळापत्रकानुसार मान्सून गोवामार्गे सात जून रोजी महाराष्ट्रात दाखल होतो. पण, अनेकदा अनुकूल परिस्थितीअभावी ही तारीख पुढे मागे होते. यंदाही ही तारीख पुढे गेली आहे. बुधवारी मान्सून अरबी समुद्राच्या मध्येकडील आणखी काही भाग, केरळ, तामिळनाडूचा उर्वरित भाग, कर्नाटकच्या किनारी भागाकडील बहुतांश भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडील काही भाग, रायलसीमाचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग व बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झाला.
पुढील तीन ते चार दिवसात मान्सून संपूर्ण गोवा, अरबी समुद्राच्या मध्येकडील आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाडा, कोकणात पावसाचा जोर अधिक होता. पुढील दोन दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुण्यात गुरूवारी काही भागात दुपारी किंवा संध्याकाळपर्यत पावसाची शक्यता आहे.