खूशखबर! मुंबईत आनंद सरी, मान्सून उद्या कोकणात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 07:55 AM2022-06-10T07:55:00+5:302022-06-10T07:55:21+5:30
Monsoon : ठाण्यात गुरुवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने घरी परतणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली होती. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, मीरा-भाईंदर आदी भागांतही पावसाने हजेरी लावली.
मुंबई : चातकासारखी मान्सूनची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना गुरुवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. पूर्व व पश्चिम उपनगरासह शहरांतील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या.
मान्सूनपूर्व का असेना, मात्र या आनंदसरींनी मुंबईकर सुखावले.
ठाण्यात गुरुवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने घरी परतणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली होती. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, मीरा-भाईंदर आदी भागांतही पावसाने हजेरी लावली. नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पाऊस झाला. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर वाशी स्थानकाजवळ ओएचई तुटल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली.
मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात स्थिती अनुकूल झाली आहे. तसेच अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकू लागला असून, मान्सूनची वाटचाल उत्तरेकडे सुरू झाली असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
दक्षिण महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त येत्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागासह बंगालच्या उपसागरात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यापुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी हवामान अनुकूल आहे.
- कृष्णानंद होसाळीकर,
अतिरिक्त महासंचालक,
भारतीय हवामानशास्त्र विभाग