खुशखबर! आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार, राजेश टोपे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 02:54 AM2020-05-20T02:54:45+5:302020-05-20T07:17:47+5:30
टोपे यांनी मंगळवारी लॉकडाउनचा चौथा टप्प्यातील नियमावली तसेच कोरोनाबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत.
मुंबई : कोरोनासोबत लढताना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागातील १७ हजार रिक्त पदे लवकरच भरली जातील. यात डॉक्टरांपासून सर्व वर्गातील पदे जलदगतीने भरण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे यांनी मंगळवारी लॉकडाउनचा चौथा टप्प्यातील नियमावली तसेच कोरोनाबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. मुंबई वगळता राज्यात कुठेच बेडची कमतरता नाही. मुंबईतही साठ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असून महिनाभरात ही संख्या एक लाखावर नेण्याच्या दृष्टीने महापालिका स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. आता मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मलेरिया, डेंग्यू तसेच अन्य पावसाळी साथ रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर आहे. नियुक्त्या आणि भरतीसाठी गरज असल्यास अतिरिक्त समित्या बनवाव्यात, मुलाखतींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.
कोरोनाबाधितांबाबत सहानुभूती हवी
कोरोना विरूद्धच्या या लढ्यात शिक्षित व्हा, सजग व्हा पण माणुसकी घालवू नका. अनेक ठिकाणी संशयित रुग्ण किंवा अलगीकरणात असलेल्या व्यक्ती, परिवारांसोबत चुकीच्या वर्तनाची माहिती येत आहे. ही बाब चुकीची आहे. कोरोनाबाबत शिक्षित, सजग व्हा पण माणुसकी हरवू नका, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
मुंबईत केंद्रीय सुरक्षा बलाच्या ५ तुकड्या
राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १,३२८ वर गेली असून १२ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. अखेर, पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या राज्यभरात दाखल होत असून यापैकी मुंबईत ५ तुकड्या तैनात असतील. राज्य पोलीस दलात पावणे दोन लाखांच्या जवळपास पोलीस कार्यरत आहेत. लॉकडाउनच्या काळात विविध नियमांची अंमलबजावणी, बंदोबस्तासह विविध जबाबादारीचे ओझे पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढला आहे.