आनंदाची बातमी; आता घरबसल्या होणार विठुरायाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:08 PM2019-07-01T17:08:55+5:302019-07-01T17:11:09+5:30
थेट दर्शनासाठी दोन कंपन्यांशी करार; मंदिर समितीच्या उत्पन्नात भर पडणार
सचिन कांबळे
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे थेट दर्शन दाखविण्याचे हक्क दोन कंपन्यांना देण्यात आले आहेत़ तसा करार झाला असून यामुळे मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
पंढरपुरात रोज हजारो तर यात्रा कालावधीत लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येतात. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज विठ्ठल मंदिरात जाणे प्रत्येक भाविकांना शक्य होत नाही़ तसेच यात्रेच्या गर्दीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी न येणाºया भाविकांना घरबसल्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे. या हेतूने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन सुरु करण्यात आले आहे.
श्री विठ्ठलाचे थेट दर्शन पुरविण्याबाबत मंदिर समितीकडून हक्क देण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. यामुळे अनेक टीव्ही चॅनलने हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते; मात्र मंदिरे समितीने जिओ कंपनी व टाटा स्काय कंपनीला विठ्ठल-रुक्मिणीमातेचे थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क दिले आहेत़
आजारी, अपंग या कारणाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी न येणाºया भाविकांना इंटरनेटवर जिओ टीव्ही व टाटा स्कायच्या माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणीमातेचे आॅनलाईन दर्शन घेता येणार आहे. तसेच मंदिर समितीला यातून सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. यामुळे पंढरी नगरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना त्या उत्पन्नातून आणखी चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.