खुशखबर...लवकरच लोकल व एक्स्प्रेसमध्येही मिळणार 'वाय-फाय'
By admin | Published: November 3, 2016 09:09 AM2016-11-03T09:09:01+5:302016-11-03T09:12:49+5:30
लवकरच लोकल आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्येही 'फ्री वाय-फाय' सेवा उपलब्ध होणार आहे.
Next
ऑननलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मुंबई उपनगरीय रेल्वेच्या अनेक स्थानकांवर मोफत वाय-फाय उपलब्ध झाल्याने प्रवासी खुशीत आहेत. आता याच प्रवाशांसाठी रेल्वेने आणखी एक चांगली बातमी आणली आहे. ती म्हणजे लवकरच लोकल आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्येही (लांब पल्ल्याच्या गाड्या) ' फ्री हायस्पीड' इंटरनेट सुरू होणार आहे.
मुंबईतील मध्य व पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये हायस्पीड वायफाय उपलब्ध होणार आहे. 'रेलटेल'तर्फे यासाठी प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रवासी लोकल आणि एक्स्प्रेस ट्रेन्समध्येही वाय-फायचा लाभ घेऊ शकतील. तसेच या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार असल्याचे समजते. रेल्वे स्थानकांवर ‘रेलवायर’ नावाने मोफत वाय-फाय सेवा पुरविण्याचे काम ‘गूगल’च्या सहकार्याने ‘रेलटेल’ ही रेल्वेची उपकंपनी करते.
२०१८ सालापर्यंत या सुविधा उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सर्व उपनगरी गाड्या आणि राजधानी, शताब्दी, दुरांतो सारख्या १०० लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेकडे पंतप्रधान कार्यालयाकडून जातीने लक्ष पुरवण्यात येत असल्याची माहिती ' रेलटेल'च्या एका अधिका-याने दिली. दरम्यान ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर गाड्यांमध्ये वायफायचा स्पीड ४५ mbps असेल, मात्र सुमारे ३० मिनिटं इंटरनेट वापरल्यानंतर ब्राऊजिंगचा वेग कमी होईल. प्रत्येक लोकलमधील अंदाजे १२०० प्रवासी एकाच वेळी हायस्पीड वायफाय वापरु शकतील, असेही त्यांनी सांगितले.