सर्वसामान्यांसाठी खूशखबर! म्हाडाची मे महिन्यात पुन्हा ३ हजार घरांची सोडत!
By admin | Published: August 11, 2016 05:03 AM2016-08-11T05:03:39+5:302016-08-11T05:03:39+5:30
मुंबईतील ९७२ घरांसाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी यशस्वीरित्या सोडत काढल्यानंतर आता पुढील वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यांत सुमारे ३ हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर
मुंबई : मुंबईतील ९७२ घरांसाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी यशस्वीरित्या सोडत काढल्यानंतर आता पुढील वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यांत सुमारे ३ हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या तीन हजार घरांमध्ये सर्वसामान्यांच्या घरांसह गिरणी कामगारांच्या घरांचाही समावेश असेल. गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांच्या घरांसाठीची सोडत स्वंतत्ररीत्या काढण्यात येणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील तब्बल ९७२ घरांसाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी सकाळी ९ वाजता घरांची सोडत सुरू झाली. लॉटरीची प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होती. ९७२ घरांसाठी प्राधिकरणाकडे तब्बल १ लाख ३६ हजार ५७७ अर्ज दाखल झाले होते. या अर्जदारांपैकी ९७२ भाग्यवंताना मुंबईत म्हाडाचे घर मिळाले आहे. या सोडतीच्या वेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात म्हाडाच्या एकूण ३ हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या घरांमध्ये गिरणी कामगारांसह सर्वसामान्यांसाठीही घरे असतील. मात्र, ती किती असतील? याबाबतचा आकडा सध्या तरी निश्चितरीत्या सांगता येणार नाही. गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांसाठीच्या घरांची सोडत स्वतंत्ररीत्या काढली जाईल.’
मुंबई शहर आणि उपनगरात घरे बांधण्यासाठी भूखंड शिल्लक राहिलेले नाहीत. घरांच्या निर्मितीसाठी मुंबई महानगर प्रदेशात ८३८ हेक्टर जमीन महसूल विभागाकडून घेण्यात येणार आहे. गृहनिर्माण विभाग पोलिसांना घरे देण्याबाबत म्हाडा सकारात्मक आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी) मुंबई शहर आणि उपनगरात घरे बांधण्यासाठी भूखंड शिल्लक राहिलेले नाहीत. घरांची मागणी वाढत असली, तरी त्या तुलनेत घरांचा पुरवठा करण्यात म्हाडा अपयशी ठरले आहे. परिणामी, अधिकाधिक परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी मुंबई महानगर प्रदेशात ८३८ हेक्टर जमीन महसूल विभागाकडून घेण्यात येणार आहे.