सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस
By Admin | Published: August 19, 2015 01:04 AM2015-08-19T01:04:38+5:302015-08-19T01:04:38+5:30
सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा असून आॅगस्ट महिन्याचे पुढचे १० दिवस कोरडेच जातील, अशी भीती ज्येष्ठ हवामानाशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी
पुणे : सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा असून आॅगस्ट महिन्याचे पुढचे १० दिवस कोरडेच जातील, अशी भीती ज्येष्ठ हवामानाशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात एल निनो घटक प्रभावहीन ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी दहा दिवस राज्यात पाऊस होण्याची चिन्हे नसून त्यामुळे सर्व पिकांना ताण सहन करावा लागेल. जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होऊ शकेल, मात्र सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साबळे म्हणाले, जून, जुलै आणि आॅगस्टमध्ये पावसात खंड पडेल, हा अंदाज खरा ठरला. आगामी दहा दिवस पावसात खंड पडणार आहे. त्यामुळे खरिपाच्या सर्व पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागेल. जिरायती भागात जेथे उशिरा उगवण झाली आहे, त्या पिकांना धोका उद्भवेल. सध्याचा चारा पुढच्या दहा दिवसांत संपून नव्या चाऱ्याची उगवण होईपर्यंत जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा होऊ शकेल. पिण्याच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन काही ठिकाणी समस्या उद्भवू शकले, असेही ते म्हणाले.
२७ किंवा २८ आॅगस्टपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल. १५ आॅक्टोबरपर्यंत चांगला पाऊस होईल. त्याचा फायदा रब्बीच्या पेरण्यांना होईल, असे त्यांनी सांगितले.
हवामानशास्त्र विभागाने पावसात दहा टक्के घट होईल, असे म्हटले आहे. मात्र तो जून ते आॅगस्ट दरम्यानचा अंदाज आहे. एल निनोचा परिणाम पुढच्या पावसावर दिसेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, माझ्या अभ्यासानुसार एल निनोचा परिणाम जाणवणार नाही, असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)