राज्यात चारही महिने यंदा चांगला पाऊस
By admin | Published: May 20, 2016 01:19 AM2016-05-20T01:19:22+5:302016-05-20T01:19:22+5:30
यंदा देशात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) चांगला असून, तो सरासरीपेक्षा जास्त असेल.
पुणे : यंदा देशात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) चांगला असून, तो सरासरीपेक्षा जास्त असेल. महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण या वर्षी चांगले असणार आहे. पावसाळ््याच्या चारही महिन्यांत चांगला किंबहुना सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र आणि देशात पडणाऱ्या दुष्काळामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेला अंदाज योग्य आहे, असे सांगत डॉ. साबळे म्हणाले, की सध्या राज्याचे आणि देशाचे तापमान वेगाने वाढत आहे. ते चांगला पाऊस पडण्यासाठी अनुकूल आहे. पाऊस कमी पडण्यासाठी कारणीभूत असलेली ‘एल निनो’ ही हवेची स्थिती यंदा कमजोर आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण चांगले असणार आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत ही ‘एल निनो’ची स्थिती पूर्णपणे कमजोर होईल.