यावर्षी होणार चांगला पाऊस; भेंडवलच्या भविष्यवाणीतून शेतक-यांना दिलासा
By Admin | Published: May 10, 2016 09:43 AM2016-05-10T09:43:16+5:302016-05-11T03:04:55+5:30
दरवर्षीप्रमाणे जळगाव जामोद तालुक्याती भेंडवल येथील भविष्यवाणीस सुरूवात झाली असून या मांडणीचे भाकित आज सकाळी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार यावर्षी पाऊस साधारण स्वरूपात चांगला होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
जळगाव जामोद (बुलडाणा), दि.१० - विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकºयांना पीक-पाण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरणाºया सुप्रसिध्द भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत आज १० मे रोजी पहाटे ३ वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. भरपूर पावसाळा, पीक परिस्थिती चांगली पण पिकांची नासाडी, अवकाळी पाऊस नसला तरी चारा टंचाईचे संकट राहील. राजा कायम असला तरी त्याच्यावर संकट राहील, देशाच्या सीमेवर घुसखोरी हाईल अशा अनेक भाकितांमुळे पुढील वर्षाचे कृषीक्षेत्र तसेच देशाची स्थितीही कशी राहिल याचा अंदाज या भाकितांमधून व्यक्त करण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात पूर्णा नदीच्या परिसरात वसलेल्या भेंडवळ बु. या गावी ३०० वर्षापूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरु केलेली घटमांडणी आज महाराष्ट्रभर प्रसिध्द झाली. गुढीपाडव्याला झालेल्या पारावरच्या मांडणीचे भाकीत आणि अक्षय्य तृतीयेच्या मांडणीचे निष्कर्ष यावरुन होणारी भविष्यवाणी आजपर्यंत कमी अधिक प्रमाणात खरी घडत आली.
चारा पाण्याची टंचाई देशावर संकट येईल. पावसाळा पहिला महीना साधारण आहे आणि लहरी स्वरूपाचा दूसरा आणि तीसरा चांगला तीसरा कमी अवकाळी पाऊस कमी चारा पाण्याची टंचाई आहे. काही भागात अतिवृष्टि होईल, देशावर आर्थिक संकट येईल. देशाचा राजा म्हणजे पंतप्रधान यांच्यावर राजकीय आणि आर्थिक संकटे येतील, असे भाकित वर्तवण्यात आले आहे.
असे आहेत पुंजाजी महाराज
मांडणीचे भाकीत करणारे पुंजाजी महाराज चंद्रभान महाराजांच्या १२ व्या पिढीचे वंशज आहेत. आतापर्यंत त्यांचे वडील रामदास महाराज वाघ हे भाकीत सांगायचे. परंतु या वर्षातच त्यांचे निधन झाल्याने ही परंपरा पुंजाजी महाराजांच्या खांद्यावर आली. पुंजाजी महाराज हे अतिशय साधे आणि सरळ व्यक्तीमत्व असून त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी त्यांनी गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत दररोज पुर्णेचे पाणी पायी जावून आणणे. स्वत:चा स्वयंपाक गोमुत्रामध्ये स्वत:च करून खाणे तेही दिवसात एकच वेळ, असे कडक व्रत त्यांनी केले व ही परंपरा सांभाळणा-याला दरवर्षी हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात.
राजा कायम पण संकटांचा ताण
राजकीय भाकीतामध्ये देशाचा राजा म्हणजे पंतप्रधान कायम राहील. त्यात कुठलाही बदल संभवत नाही मात्र आर्थिक आणि नैसर्गिक संकटांचा ताण राहील. त्यामुळे राजाला चिंता सतावेल. अतिवृष्टी, पिकांची नासाळी, भूकंप, शत्रुंची घुसखोरी अशा प्रकारच्या संकटांना देशाला (राजाला) सामोरे जावे लागेल. त्याचा ताण अर्थव्यवस्थेवर जाणवेल.
अशी होते घटमांडणी
अक्षय तृतीयेच्या संध्येला गावाबाहेरील शेतात पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज हे आपल्या अनुयायांसह आले. चंद्रभान महाराज की जय म्हणत त्यांनी मातीचा गोल घट तयार केला. घटात मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पावसाळ्याचे प्रतिक म्हणून चार मातीची मोठी टेकडे ठेवण्यात आली. त्यावर समुद्राचे प्रतिक असलेली पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पृथ्वीचे प्रतिक पुरी त्यावर गुराढोरांच्या चारापाण्याचे द्योतक सांडोळी, कुरडई आणि पापड ठेवला तसेच मांडणीमध्ये अर्थव्यवस्थेचे प्रतिक समजली जाणारी करंजीही (कानोला) पुरीवर ठेवलेली असते. त्यानंतर खड्यात एका बाजूला विड्याचे पान म्हणजे राजाची गादी आणि त्यावर लाल सुपारी म्हणजे देशाचा राजा असतो. त्यानंतर गोल घटात अंबाडी, सरकी (कपासी), ज्वारी, तुर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, तांदुळ, जवस, लाख, वटाणा, गहू, हरभरा, करडी आणि मसूर ही एकंदर १८ धान्ये गोलाकार ठेवण्यात आली. त्यामध्ये अंबाडी हे धान्य कुलदैवत, मसूर हे शत्रू तर करडी हे धान्य देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि भादली हे धान्य पिकवरील रोगराईचे द्योतक समजले जाते. ही मांडणी करुन परत गेल्यानंतर रात्रभर कुणीही या शेताकडे फिरकत नाही. त्यानंतर पहाटे येवून चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत या घटात झालेले बदल लक्षात घेवून महाराजांनी आज यंदाचे भाकीत जाहीर केले. भाकीत जाहीर करताना त्यामध्ये पारावरच्या मांडणीचाही आधार घेण्यात आल्या दोन्ही मांडणीची भाकीते एकमेकांशी साधर्म्य साधणारी होती.
चंद्रभान महाराजांची परंपरा
- विदर्भासह महाराष्ट्रात ही घटमांडणी सत्यतेच्या आधारावर प्रसिध्द झाली आणि आजच्या युगातही या मांडणीची विश्वासर्हता शेतकºयांमध्ये कायम आहे.
- चंद्रभान महाराजांना निलावती नावाची विद्या येत होती. त्यावरुन त्यांना पशुपक्षांची भाषा कळायची अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून या परिसरातील शेतकरी भेंडवळ मांडणीच्या आधाराने चालायचे कालांतराने या मांडणीची सत्यता लोकांना पटली आणि आज ही एका खेड्यात होणारी घटमांडणी महाराष्टाभरच नव्हे तर देशभर पोहचली.
- शेतक-यांचा या मांडणीवर असलेल्या दृढ विश्वासामुळे आजही ही मांडणी ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित होते.
पिकाचे भाकीत:
१) कापाशी : यावर्षी कापशीचे पिक हे चांगले राहील.
2) गहू : यावर्षी गव्हाचे पीक हे साधारण राहील. त्यांचा भाव कमी जास्त राहील .
3) ज्वारी: ज्वारीचे पीक चांगले राहील . पण या पीकाची नासाडी राहील.
4) बाजरी : बाजरीचे पीक चांगले राहील.
5) तीळ : हे पीक साधारण राहील . पण या पिकाची जास्त नासाडी होईल.
6) तुर : यावर्षी तुरीचे पीक चांगले राहील.
7) उडीद आणि मुग :- हे पिक चांगले राहील. परंतू नासाडी होईल.
8) हरभरा : हे पीक चांगले राहील.आणि भाव जास्त राहील.
9) मठ : हे पीक साधारण राहील.