पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:36 PM2020-04-15T18:36:51+5:302020-04-15T18:37:25+5:30
पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केले दीक्षा अॅप डाऊनलोड
पुणे: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन अभ्यासमालेला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दीक्षा अॅप डाऊनलोड करून घेतले. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अॅपच्या माध्यमातून स्वयं अध्ययन सुरू करावे, असे आवाहन राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांवर आधारित अभ्यासक्रम शिकता यावा, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकातील पाठांसह अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करणे शक्य झाले आहे.
देशासह राज्याचा लॉकडाऊनचा कालावधी वाढला असून विद्यार्थ्यांना घराबाहेर पडता येणार नाही.परिणामी शाळा सुरू होत नाही तोपर्यंत ऑनलाईन साधनांच्या माध्यमातून पुढील शैक्षणिक वषार्चा अभ्यासक्रम शिकावा लागणार आहे.एकाच दिवसात राज्यातील 3 लाख 68 हजार 798 विद्यार्थ्यांनी हे ?प डाऊनलोड करून घेतले.त्यामुळे इतरही विद्यार्थ्यांनी दीक्षा अॅपचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून केले जात आहे.
----------
विद्यार्थ्यांना स्वत: च्या गतीने स्वअध्ययन करण्याचा सराव होणार आहे.विद्यार्थ्यांना स्वआकलन करून ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य या शिक्षणाच्या विविध टप्प्यातून जाता येईल. -दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य