बियाणे चांगलेच! सदाभाऊंचा शेट्टींना प्रतिटोला
By admin | Published: June 12, 2017 07:40 PM2017-06-12T19:40:21+5:302017-06-12T19:40:21+5:30
यंदा पाऊसमान चांगले असल्याचे सांगितले जात आहे. त्यात माझ्याकडे कृषी खाते आहे
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 12 - यंदा पाऊसमान चांगले असल्याचे सांगितले जात आहे. त्यात माझ्याकडे कृषी खाते आहे. त्यामुळे चांगल्याच बियाणांचा पुरवठा करू, बियाणे चांगलेच आहे. त्यामुळे उगवणही चांगलीच होईल, असा प्रतिटोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी खा. राजू शेट्टी यांना लगावला. कर्जमाफीचे श्रेय सर्वांनी घ्यावे. त्याचा आनंदही सर्वांनी लुटावा, असा चिमटाही त्यांनी काढला.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कर्जवाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी सदाभाऊ खोत सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा. राजू शेट्टी यांनी सोमवारीच घात आल्यावर पेरणाऱ्यांचे बियाणे चांगले असेल तरच उगवण चांगली होईल, असा टोला सदाभाऊंना लगावला होता. त्याबाबत खोत म्हणाले की, खा. शेट्टी यांनी कोणत्या अर्थाने हे वक्तव्य केले, ते माहीत नाही. पण मी कृषिमंत्री आहे. माझ्याकडून चांगल्याच बियाणांचा पुरवठा होईल. चांगले बियाणे निश्चित उगवेल!
खोत यांना घात आली का? असा प्रश्न विचारला असता, यंदा पाऊसमान चांगले असल्याचा अंदाज वर्तविला आहे, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य टाळले.
कर्जमाफीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटातून आपणाला वगळण्यात आल्याचा मुद्दा फेटाळत खोत म्हणाले की, सरकार एक कुटुंब असून, मुख्यमंत्री त्याचे कुटुंबप्रमुख आहेत. ते सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतात. मंत्रिगटाच्या स्थापनेवेळी त्यांनी सर्व मंत्र्यांशी चर्चा करून सामुदायिक निर्णय घेतला होता. त्यामुळे या गटातून मला डावलण्याचा प्रश्नच येत नाही. कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. त्याचे श्रेय कोणीही घ्यावे. ज्यांना आमच्यापासून आनंद घ्यायचा आहे, त्यांनी घ्यावा. समाजातील कोणताही घटक दु:खी असू नये, या भूमिकेतून सरकार काम करीत आहे. गेल्या दोन वर्षांत उसाचे आंदोलन उभे राहिले नाही. यातूनच सरकार शेतकऱ्यांसाठी काम करीत असल्याचे सिद्ध होते.
महिन्याभरात कर्जमुक्ती
पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारल्यापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. असा प्रकार राज्यात पहिल्यांदा घडला आहे. यापूर्वीच्या शासनाने कधी आंदोलनाबाबत सकारात्मक पाऊल उचलले नव्हते. त्याचा मी साक्षीदार आहे. मंत्रिगटाच्या बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता त्याच्या निकषाबाबत मंत्री व शेतकरी नेते यांची संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीची सुस्पष्टता होईल. आम्ही महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांची समिती नियुक्त करून शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती घेण्याचे सुरू केले आहे. येत्या महिन्याभरात कर्जमाफी निश्चित होईल, असेही खोत यांनी स्पष्ट केले.