जड पावलांनी निरोप!
By admin | Published: July 28, 2015 04:17 AM2015-07-28T04:17:56+5:302015-07-28T04:17:56+5:30
पंढरपुरातून परतणाऱ्या भाविकांची अवस्था या अभंगातील ओवीतील माहेरवाशीण मुलीसारखी व्याकूळ झाली. विठुरायाच्या दर्शनाने कृतार्थ झालेल्या या वारकऱ्यांनी जड पावलांनी पंढरीचा निरोप घेतला़.
- दीपक होमकर, पंढरपूर
कन्या सासुराशी जाये।
मागे परतुनी पाहे।।
तैसे झाली माझिया जीवा।
पुन्हा केव्हा भेटशी केशवा।।
पंढरपुरातून परतणाऱ्या भाविकांची अवस्था या अभंगातील ओवीतील माहेरवाशीण मुलीसारखी व्याकूळ झाली. विठुरायाच्या दर्शनाने कृतार्थ झालेल्या या वारकऱ्यांनी जड पावलांनी पंढरीचा निरोप घेतला़.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात सोमवारी अकरा लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. रात्री विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढे गेली होती. त्यामुळे बारीत थांबलेल्यांना विठ्ठल दर्शनासाठी तब्बल २२ तासांहून अधिक वेळ लागत होता. विठ्ठल दर्शनासाठी तहान-भूक हरवून ही विठ्ठलाची लेकरे रांगेत उभीच होती.
एकादशी सोहळ्यानिमित्त एक दिवस आधीच अगणित पालख्या आणि असंख्य वारकरी पंढरीत जमल्यामुळे सोमवारी पंढरपूर शहर वारकऱ्यांसाठी अपुरे पडत असल्याचे चित्र दिसत होते. रस्त्यांच्या दुतर्फा, बसस्थानक आणि मोकळी जागा मिळेल त्या ठिकाणी नागरिकांनी मुक्काम ठोकला. भल्या पहाटे चंद्रभागेत स्नान करून कुणी पददर्शन बारीत तर कुणी मुखदर्शन बारीत उभे राहिले. कुणी कळसाचे दर्शन घेऊन परतीची वाट धरली. ‘आजी दिवस धन्य, झाले तुमचे दर्शन’ या ओवीप्रमाणेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
परतीच्या प्रवासाची लगबग
-एकादशीनिमित्त बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्या प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. आषाढीच्या दिवशी विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून बस, रेल्वेने हजारो भाविक सोमवार सायंकाळपर्यंत दाखल होत होते. दिंडीबरोबर एक-दोन दिवस आधीच आलेल्या वारकऱ्यांंपैकी १५ ते २० टक्के भाविकांनी परतीच्या प्रवासासाठी एसटी, रेल्वेला गर्दी केली होती.
हजारोंनी घेतले
‘पैस’ खांबाचे दर्शन
-नेवासा (अहमदनगर) : आषाढी एकादशीनिमित्त लाखभर वारकऱ्यांनी येथील संत ज्ञानेश्वर मंदिरातील माउलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या ‘पैस’ खांबाचे दर्शन घेतले. पहाटे चार वाजता ‘पैस’ खांबासह विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना अभिषेक करण्यात आला. आरती झाली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी रांगेचे रूपांतर मोठ्या दर्शन बारीत झाले. माउलींच्या प्राकृत पादुका माउलींच्या ‘पैस’ खांबासमोर दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.
मंदिर परिसरात रांगाच रांगा
विठ्ठलाच्या पददर्शन व मुखदर्शनासाठी तासागणिक किलोमीटरच्या पटीत रांग वाढत गेली. तशीच रांग नामदेव पायरीच्या दर्शनासाठी व लाडू प्रसाद विक्री केंद्राच्या बाहेर मिनिटागणिक मीटर-मीटरने वाढत गेली होती. त्यामुळे मंदिराच्या सर्व बाजूने केवळ रांगाच रांगा दिसत होत्या.