‘गुड टच, बॅड टच’च्या शिक्षणामुळे टळला अतिप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:51 AM2017-08-11T04:51:34+5:302017-08-11T04:51:38+5:30
अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ‘पोलीस दीदी’ उपक्रमाअंतर्गत शाळकरी मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात आहे.
मुंबई : अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ‘पोलीस दीदी’ उपक्रमाअंतर्गत शाळकरी मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात आहे. याच शिक्षणामुळे केजीतील ६ वर्षांच्या चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला. या प्रकरणी २५ वर्षांच्या नोकराला कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे.
कुर्ला परिसरात ६ वर्षांची नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. आईवडील दोघेही नोकरी करतात. त्याच परिसरात ती अन्य तीन मैत्रिणींसोबत खासगी शिकवणीला जाते. नेहाचे पालक आणि अन्य मैत्रिणींचे पालक आलटूनपालटून मुलींना घरी घेऊन येतात. बुधवारी सायंकाळी नेहाला अन्य मैत्रिणीच्या आईने तिच्या घरी नेले. नेहाचे आईवडील कामानिमित्त बाहेर होते. त्यांनी २५ वर्षीय नोकराला नेहाला घ्यायला पाठविले. दीड वर्षापासून तो त्यांच्या दुकानात काम करत असल्याने त्याच्यावर त्यांना विश्वास होता.
नोकराने नेहाला मैत्रिणीच्या घरातून घेतले आणि त्याच इमारतीच्या गच्चीवर नेले. तेथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेत पोलीस दीदी उपक्रमाअंतर्गत तिला ‘गुड टच, बॅड टच’चे लैंगिक शिक्षण मिळाले होते. त्यामुळे तिने बचावासाठी आरडाओरड केली. तो ऐकून गच्चीवर आलेल्या सुरक्षारक्षकामुळे हा प्रकार उघडकीस आला. कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लालासाहेब शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला पोलिसांनी नोकराला पॉक्सो आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली. न्यायालयाने त्याला ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे ‘पोलीस दीदी’ उपक्रम?
मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या नेतृत्वाखाली ‘पोलीस दीदी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत महिला पोलीस शाळेतील लहान मुला-मुलींना लैंगिक शिक्षणाचे धडे देतात. चांगला, वाईट स्पर्श कसा ओळखायचा, यातून बाहेर कसे पडायचे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.