#GoodBye2017: वर्षभरात नारायण राणेंच्या राजकीय प्रवासात काटेच
By वैभव देसाई | Published: December 28, 2017 07:16 AM2017-12-28T07:16:13+5:302017-12-28T11:13:20+5:30
मुंबई- गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नारायण राणेंना भाजपानं आश्वासन देऊन अद्याप मंत्रिपद न दिल्यामुळे ते कायम चर्चेत असतात. अवघ्या कोकणावर अधिपत्य असल्याचा आविर्भाव असलेल्या राणेंना देवेंद्र फडणवीस मंत्री कधी करणार, असा प्रश्न आता राणे समर्थकांना सतावू लागला आहे.
मुंबई- गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नारायण राणेंना भाजपानं आश्वासन देऊन अद्याप मंत्रिपद न दिल्यामुळे ते कायम चर्चेत असतात. अवघ्या कोकणावर अधिपत्य असल्याचा आविर्भाव असलेल्या राणेंना देवेंद्र फडणवीस मंत्री कधी करणार, असा प्रश्न आता राणे समर्थकांना सतावू लागला आहे. काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे राणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या तंबूत सामील झाले. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये दाखल झालेले नारायण राणे राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. नारायण राणेंना लवकरच मंत्रिपद दिलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु नारायण राणे कधी मंत्री होणार, हाच प्रश्न वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिला गेला आहे. नारायण राणेंना आपल्या कोट्यातून आमदार करून मंत्रिपद देण्यास भाजपा उत्सुक असले तरी शिवसेनेच्या विरोधामुळे ते शक्य झालेले नाही. राणेंच्या माध्यमातून भाजपाला कोकणात हातपाय पसरून शिवसेनेला नामोहरम करायचं आहे. मात्र शिवसेना सत्तेत असल्यामुळे भाजपानं सावध पवित्रा घेतला आहे. राणेंना भाजपाच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचे फडणवीसांचे मनसुबे असले तरी शिवसेनेचा राणेंना असलेला विरोध पाहता भाजपानं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला आहे.
राणेंच्या आमदारकीची वाट बिकटच
स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपाशी घरोबा केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेवर पुन्हा निवडून येण्यासाठी बरीच दमछाक करावी लागणार आहे. राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या जागेवरून प्रसाद लाड निवडून आले आहेत. त्यामुळे आता भाजपा नाशिकमधून राणेंना विधान परिषदेवर पाठवण्याच्या तयारीत आहे. नाशिकमध्ये तशीही बाहुबली नेत्यांना स्वीकारार्हता लाभण्याची परंपरा आहे. नाशिकमध्ये स्थानिक तीन व जिल्ह्यातील एक असे चार आमदार आणि धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला काही परिसर पाहता दिंडोरीसह दोन खासदार भाजपाकडे असले तरी, यापैकी एकाचीही राज्यस्तरीय मातब्बरी नाही. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारीसाठी जी नावे पक्षात घेतली जात आहेत, त्यात निवडून येण्याबद्दल खात्री बाळगावी असे कोणतेही नाव नाही. त्यामुळे नाशकातून राणे यांना पुरस्कृत करण्यात भाजपामध्ये तशी काही अडचण वा विरोध होण्याची शक्यता नाही. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, खुद्द भाजपाकडून इच्छूक असलेल्या किंबहुना गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला आहे.
राणेंच्या एनडीए प्रवेशामुळे कोकणमधील भाजपाचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
भाजपातीलच काही नेत्यांचा विरोध असल्याने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना भाजपाने प्रवेश न देता वेगळा पक्ष काढण्याचा सल्ला दिला. राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेल्यापासून त्यांनी भाजपावर टीकेची एकही संधी सोडलेली नाही. राणेंना पक्षात घेण्यास विरोध असलेल्या नेत्यांनीच काही महिन्यांपूर्वी त्यांचा प्रवेश रोखून धरण्यात यश मिळविले होते.
भाजपात घुसून मंत्रिपद मिळविण्याचा राणेंचा प्रयत्न फसला
शिवसेनेत मुख्यमंत्री आणि काँग्रेसमध्ये महसूल मंत्री राहिलेले नारायण राणे यांचा भाजपात घुसून मंत्रिपद मिळविण्याचा प्रयत्न फसला. त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे त्यांना आपल्या घरी कित्येक तास वाट पाहायला बसवून ठेवून गाणे ऐकायला निघून गेले, तेव्हाच त्यांच्या लेखी नारायण राणे यांना फारशी किंमत नाही हे सा-यांच्या लक्षात आले.
राणेंची बोळवण दुय्यम खात्यावर
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता नव्या वर्षात होणार असून नव्या पक्षाची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ समावेश निश्चित मानला जात आहे. मात्र त्यांना दुय्यम खात्यावरच समाधान मानावे लागेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गृह, नगरविकास, महसूल, सार्वजनिक बांधकाम, वित्त ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहेत. यापैकी कोणतेही खाते राणे यांना मिळण्याची शक्यता नाही. चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिमंडळातील ‘नंबर टू’ हे स्थान कायम राहील, असे सूत्रांनी सांगितले. ‘माजी मुख्यमंत्री असल्याने, व याआधी महसूलसारखे महत्त्वाचे खाते सांभाळल्याने आपल्या दर्जाला साजेल, असे मंत्रिपद दिले जावे’, असा राणे यांचा आग्रह आहे.
आमदारकी सोडून नारायण राणेंसोबत जाणार कोण?
काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावरून गेल्या काही दिवसांपूर्वी गदारोळ झाला होता. राणेंसोबत किती आमदार येणार याची आधी खात्री करा, अशी अट भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घातली होती. जे आमदार राणेंसोबत जातील, त्यांना सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. अन्यथा पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदारकी जाईल, असा त्याग कोण करणार? हाही प्रश्न आहेच. तसेच त्यांचे पुत्र नितेश राणे आणि समर्थक आमदार कालिदास कोळंबकर अद्यापही काँग्रेसकडून आमदार असल्यानं राणेंसोबत जाण्यास इतर आमदार तयार नाहीत.
नारायण राणेंचा घटस्थापनेला 'घटस्फोट', काँग्रेसच्या आमदारकीसह सदस्यत्वाचाही दिला राजीनामा
21 तारखेला दुपारी अडीच वाजता काँग्रेस सदस्यत्वाचा नारायण राणेंनी राजीनामा दिला. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून दस-यापूर्वी माझी पुढील दिशा जाहीर करेन. येत्या काळात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राज्यातून रिकामे करणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला होता.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, नारायण राणेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय वर्तुळाला नारायण राणे पुढे काय राजकीय भूमिका घेतात याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राणेंनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. राणेंनी आपल्या नव्या पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे जाहीर केले. त्याप्रमाणेच राणेंचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाला.
मला शिवसेनेकडून ऑफर, पण जाणार नाही
मला शिवसेनेकडून ऑफर होती. त्यांच्यातील काही जणांनी मला त्यांच्या नेत्यांशी थेट बोलणी करण्यास सांगितलंही होतं. पण मी सुरुवातीलाच त्या गोष्टीला नकार दिला. मी स्पष्ट शब्दात सांगितलं की, मला शिवसेनेत यायचं नाही.’ सिंधुदुर्गात झालेल्या एका सभेनंतर राणेंनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
भाजपा शिवसेनेच्या विरोधात करणार नारायण राणेंचा वापर
सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यावर उपाय म्हणून आता भाजपा ‘नारायण’अस्त्राचा वापर करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या माध्यमातून शिवसेनेला जेरीस आणण्याचे भाजपाचे इरादे आहेत. सत्तेत राहून शिवसेना सतत सरकारवर टीका करत असते. आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाल्यामुळे शिवसेनेवर राणे सतत टीका करत राहतील. सत्तेत राहून सेना भाजपावर टीका करते, मग राणेही सत्तेत राहून शिवसेनेवर टीका करतील. आम्ही शिवसेनेला कधीही सरकारवर टीका करू नका, असे सांगितलेले नाही. मग राणेंच्या पक्षाला तरी कसे सांगावे, असे उत्तर एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने दिले होते.