#GoodBye2017: वर्षभरात शिक्षकांची सर्वाधिक आंदोलने, मराठा मोर्चाने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:28 AM2017-12-28T02:28:28+5:302017-12-28T07:10:53+5:30
मुंबईच नव्हे, तर राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या पीडित, कामगार आणि शोषितांसाठी आंदोलनाची पंढरी असलेल्या आझाद मैदानावर, या वर्षीही अनेक एल्गार पाहायला व ऐकायला आले.
मुंबई : मुंबईच नव्हे, तर राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या पीडित, कामगार आणि शोषितांसाठी आंदोलनाची पंढरी असलेल्या आझाद मैदानावर, या वर्षीही अनेक एल्गार पाहायला व ऐकायला आले. ‘अच्छे दिन’, ‘पारदर्शी कारभार’ व ‘विकासा’च्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या सरकारला सत्ता गमवावी लागेल की काय? अशा आंदोलनांनीही मुंबई व आझाद मैदानावर आपली छाप सोडली. त्यात मराठा क्रांती मोर्चा हा सर्वाधिक लक्षवेधी ठरला, तर सर्वाधिक मोर्चे हे शिक्षण विभागाच्या विरोधात होते. पुढील वर्षीही ही परंपरा
कायम राहण्याची शक्यता दिसत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या विरोधात रण पेटविण्याची सुरुवात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्यांनी आझाद मैदानातूनच केली होती. सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावर असताना, लाखो आंदोलकांना व शेकडो संघटनांना याच मैदानावर सामोरे जात आश्वासने दिली होती. त्याच आश्वासनांचा जाब मागण्यासाठी या वर्षी फक्त आझाद मैदानावर सुमारे ६ हजार १४१ आंदोलने झाली. त्यातील सर्वाधिक आंदोलने ही अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात झाली आहेत.
मराठा क्रांती मोर्चाचे वादळ
कोपर्डी घटनेचा निकाल आणि मराठा आरक्षण या दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुंबईवर धडकलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन, हे गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठे व लक्षवेधी आंदोलन ठरले. २०१६ साली मराठा समाजाने काढलेली बाइक रॅली, तर २०१७ सालातील मोर्चाने सगळ्यांचे लक्ष वेधले. लाखोंच्या
संख्येने मुंबईवर धडकलेल्या या मोर्चाच्या शिस्तबद्धतेने सर्वांचीच मने जिंकली होती.
अनुदानाचा तिढा सुटेना!
वेतन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या घोषित, अघोषित आणि विनाअनुदानित शाळांचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे दरवर्षी या प्रश्नावर आक्रमक होणाºया शिक्षकांचा लढा या वर्षीही सुरू होता. त्यात शासनसेवेत १ नोव्हेंबर २००५ सालापासून रुजू झालेल्या शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा अद्याप पेटता आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून पुढील वर्षीही सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
>मनसेचे खळ्ळखट्ट्याक
मराठी क्रांती मोर्चाप्रमाणे एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेट येथे निघालेला मोर्चाही लक्षवेधी ठरला. या मोर्चात मनसे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य मुंबईकरही हजारोंच्या संख्येने सामील झाले होते. राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीकोनातून हा मोर्चा मनसेला राजकीय पटलावर पुनर्जीवित करणारा ठरला. त्यानंतर, मनसेने रेल्वे स्थानकांलगतच्या फेरीवाल्यांच्या विरोधात सुरू केलेले खळ्ळखट्ट्याक आंदोलन आजही मुंबईकरांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.
अल्पसंख्याकांवरील हल्ले व महागाई
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती, नोटाबंदी आणि देशभर अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ अनेक संघटनांनी छोट्या आणि मोठ्या स्तरावर आझाद मैदानात येत, या वर्षी रोष व्यक्त केला. केंद्र व राज्य शासनाविरोधात अल्पसंख्याकविरोधी असल्याची टीकाही या वेळी झाली. त्यात साहित्यिकांसह, विचारवंत, लेखक प्रथमच आझाद मैदानावर एकवटल्याचेही दिसले.
अंगणवाडीतार्इंचा यशस्वी लढा!
मानधनवाढ, पोषण आहारात सुधारणा, पेन्शन अशा विविध मागण्यांसाठी या वर्षी संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या कृती समितीनेही महिला शक्तीचे दर्शन घडविले. आझाद मैदानावर केलेल्या शक्तिप्रदर्शनातून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सरकारला नमते घ्यायला भाग पाडले. वांद्रे-कुर्ला संकुल येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अखेर मागण्या मान्य करून
घेत, अंगणवाडीतार्इंनी लोकशाही आंदोलनांची ताकद दाखवून दिली.
>आंदोलनांची
आकडेवारी
महिना आंदोलनांची
संख्या
जानेवारी ६५८
फेब्रुवारी ४९४
मार्च ७७०
एप्रिल ६८७
मे ६०१
जून ४९३
जुलै ४८०
आॅगस्ट ७११
सप्टेंबर ३६९
आॅक्टोबर २८५
नोव्हेंबर ३४०
डिसेंबर २५३
(२५ तारखेपर्यंत)
एकूण आंदोलने
६ हजार १४१