कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू आता रेल्वेतही
By admin | Published: October 3, 2016 05:22 AM2016-10-03T05:22:55+5:302016-10-03T05:22:55+5:30
राज्यातील विविध कारागृहांमध्ये तयार करण्यात आलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू या मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना उपलब्ध केल्या जात आहेत.
मुंबई : राज्यातील विविध कारागृहांमध्ये तयार करण्यात आलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू या मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना उपलब्ध केल्या जात आहेत. यातील पहिला प्रयोग पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल-जयपूर एक्सप्रेसमध्ये केला जात असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या एक्सप्रेसमधील प्रवाशांना प्रथम चादरी आणि उश्यांचे अभ्रे देण्यात आले.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये महाराष्ट्र जेल इंडस्ट्रिजतर्फे ६६ वस्तू तयार केल्या जातात. या वस्तू पश्चिम रेल्वेकडून विकत घेण्यात आल्या असून त्याबाबतचा करार करण्यात आला आहे. याबाबतची सुरुवात १ आॅक्टोबरपासून करण्यात आली आहे. रेल्वेतील चादरी या ५६ इंच लांब व रुंद असल्याने त्या दुमडून वापरायचा प्रयत्न केल्यास प्रवाशांना तसेच रेल्वेला त्याचा मनस्ताप होतो. त्यामुळे नवीन चादरी ३८ इंचाच्या करण्यात आल्या आहेत. नवीन चादरी पांढऱ्या तसेच अन्य रंगांत आहेत. रेल्वेला चादरी आणि उशांचा पुरवठा करणे ही चांगली गोष्ट आहे. गेल्या वर्षी यातून १८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. आता रेल्वेनेही या वस्तू घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल, अशी आशा कारागृहाच्या उपमहासंचालक स्वाती साठे यांनी व्यक्त केली. प. रे.चे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनीही कैद्यांकडून बनवण्यात आलेल्या वस्तू उत्तम असल्याचे सांगत प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग राबवला जात असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
>प्रवाशांना चादरी, अभ्रे यांचा पुरवठा
येरवडा कारागृहात तयार होणाऱ्या कागदी पिशव्या आणि कोल्हापूर येथील कारागृहात तयार होणाऱ्या चादरी रेल्वे प्रवाशांना उपलब्ध केल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल-जयपूर एक्सप्रेसमधील एसी प्रथम श्रेणीचा एक, व्दितीय श्रेणीचा एक आणि तृतीय श्रेणीच्या एक डब्यामधील प्रवाशांना या वस्तू दिल्या जात आहेत.