गुंड होता होता बनलो न्यायाधीश
By admin | Published: April 26, 2017 04:18 AM2017-04-26T04:18:49+5:302017-04-26T04:18:49+5:30
इयत्ता दहावीमध्ये नापास झाल्याने घरची परिस्थिती पाहून आता पुढे शिकायचे नाही, असा निश्चय केला. गुंडगिरीकडे वळलो
पुणे : ‘इयत्ता दहावीमध्ये नापास झाल्याने घरची परिस्थिती पाहून आता पुढे शिकायचे नाही, असा निश्चय केला. गुंडगिरीकडे वळलो. पण आई खमकी होती. तिने त्या वेळी केलेल्या पहिल्याच चुकीसाठी पोलीस चौकीत नेले. त्या वेळी पोलिसांनी पिळलेला कान अजून लक्षात आहे. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून न्यायाधीश झालो,’ अशा भावना प्रथमवर्ग न्यायाधीश राहुल पोळ यांनी व्यक्त केल्या.
निमित्त होते, रिक्षा पंचायतीच्या २३व्या वर्धापन दिनाचे. यानिमित्त रिक्षाचालक बलभीम पोळ यांचा मुलगा असलेले राहुल पोळ यांचा सत्कार करण्यात आला. पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार समारंभास पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार, राहुल पोळ यांच्या आई जिजाबाई पोळ, अॅड. संगिनी पोळ, रिक्षा पतसंस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम उपस्थित होते. या वेळी पोळ यांनी आठवणींना उजाळा देत जीवनप्रवास उलगडला. या प्रवासात पत्नी संगिनी हिची साथ व कायद्याविषयी मार्गदर्शनही उपयोगी पडले, असेही त्यांनी सांगितले.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित पानसुपारी समारंभास खासदार अनिल शिरोळे यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट दिली. (प्रतिनिधी)