गोपाळ समाजाची जात पंचायत बरखास्त
By Admin | Published: March 3, 2016 04:51 AM2016-03-03T04:51:16+5:302016-03-03T04:51:16+5:30
सामाजिक बहिष्कारासारख्या अमानवी प्रथा रोखण्यासाठी विधीमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यानंतर त्यास सकारात्मक प्रतिसाद देत
अहमदनगर : सामाजिक बहिष्कारासारख्या अमानवी प्रथा रोखण्यासाठी विधीमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यानंतर त्यास सकारात्मक प्रतिसाद देत गोपाळ समाजाने जात पंचायत कायमची बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाचे राज्य सचिव पंडित लोणारे, कार्याध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी मंगळवारी औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत जात पंचायत बरखास्तीची घोषणा केली आहे.
गोपाळ समाजाचे कार्यकर्ते संभाजी पवार, संजय गिऱ्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रवींद्र सातपुते यांनी राज्य कार्यकारिणीकडे पंचायत बरखास्तीची मागणी केली होती. त्यावर कार्यकारिणीने गंभीरपणे विचार करत मंगळवारी औरंगाबादला खुली चर्चा घेतली. त्यात जात पंचायत बरखास्त करण्यावर सर्वांचे एकमत झाले.
निर्णयाबाबत समाजाचे सचिव पंडित लोणारे म्हणाले, काही प्रथा यापूर्वी बंद केल्या होत्या, तर काही प्रथा सुरूच होत्या. घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्याला व हळदी समारंभाला पशूहत्या करण्यास भाग पाडणे. तसे न केल्यास समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकणे. लग्नात मानापमानावरून होणारे भांडण, टिळ््याचा पहिला मान, विधवा महिलांना पुनर्विवाहास मनाई, पंचांनी न्यायनिवाडा करणे, दिलेले निर्णय बंधनकारक मानने, पंचांकडे दंड भरणे आदी प्रथा बंद करण्यात यश मिळाले आहे. (प्रतिनिधी)