'बड्या बड्या बाता आणि 'धोरण' खातंय लाथा,’ महाज्योती संस्थेवरून गोपिचंद पडळकरांचा विजय वडेट्टीवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 01:05 PM2021-10-21T13:05:58+5:302021-10-21T13:06:55+5:30
Gopichand Padalkar News: भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
मुंबई - भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार हे ओबीसी आणि भटक्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागीर समजून मनमानी कारभार करत आहेत. बड्या बड्या बाता आणि 'धोरण' खातंय लाथा अशी वडेट्टीवरांची गत झाली आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
पडळकर म्हणाले की, अतिसन्मानीय विजय वडेट्टीवार हे ओबीसी आणि भटके विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागिरी समजून मनमानी कारभार करत आहेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ आणि हसं या प्रस्थापितांच्या सरकारनं करून ठेवलं आहे. बड्या बड्या बाता आणि 'धोरण' खातंय लाथा अशी वडेट्टीवरांची गत झाली आहे. ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याच दाखवायचं आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा हे वडेट्टीवार साहेबांच धोरण राहिलेलं आहे.
MPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीने परीक्षा घेतली, यातील पात्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणं क्रमप्राप्त असताना महाज्योती संस्था स्पष्टपणे नकार देत आहे. मात्र दुसरीकडे सारथी संस्था व बार्टी संस्था आपल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन देत आहेत. सारथी आणि बार्टीकडून विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १० ते २५ हजार निधी मिळतो. महाज्योती मात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम करत आहे, असा आरोपही पडळकर यांनी केला.
सारथीच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत मागच्या वर्षी आंदोलन केलं तर तीन दिवसात निधी देण्याची ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली होती. आता ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत, असा घणाघाती सवालही पडळकर यांनी विचारला. म्हणजे महाज्योती संस्था ही काय ओबीसी विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी निर्माण झाली आहे की त्यांना त्रास द्यायला? हे वडेट्टीवारांनी स्पष्ट करावं. प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का? असी विचारणाही त्यांनी केली आहे.