“पवारांची संस्कृती, संस्कार शिकला तर महाराष्ट्र आणखी मातीत जाईल”; पडळकरांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:51 PM2022-05-19T12:51:27+5:302022-05-19T12:52:38+5:30
तुमची भूमिका नेहमी दुटप्पी राहिली आहे. पवारांनी या महाराष्ट्राला संस्कृती आणि संस्कार शिकवण्याची गरज नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
सोलापूर: आताच्या घडीला महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढताना दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप नेते हल्लाबोल करताना दिसत आहेत. अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्यांना इशारा दिला आहे. यातच आता भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष एका तरुणीचे लैंगिक शोषण करतो. त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यांना तुम्ही सगळे सोबत घेऊन विमानात आणि हेलिकॉप्टरमधून फिरताय, यावर तुम्ही भाष्य करत नाही. पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत. राणा दाम्पत्यावर चुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यांना १४ दिवस कोठडीत टाकलं. त्या महिला नाहीत का? अशी विचारणा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
तुम्ही या राज्यात महिलांशी किती चुकीचे वागलात
सुप्रिया सुळे सांगातहेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत. मग हे कुठले संस्कार आहेत. का त्यांनी बोलले की माफ. त्या मोठ्या घरातल्या आहेत, पवारांच्या कन्या आहेत म्हणून माफ. तुम्ही या राज्यात महिलांशी किती चुकीचे वागलात, असे म्हणत पडळकरांनी पवार घराण्यावर निशाणा साधला. तुमची भूमिका नेहमी दुटप्पी राहिली आहे. आणि पवारांनी या महाराष्ट्राला संस्कृती आणि संस्कार शिकवण्याची गरज नाही. तुमची संस्कृती आणि संस्कार जर महाराष्ट्र शिकला तर आणखी महाराष्ट्र मातीत जाईल, अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे.
दरम्यान, सगळ्या महिलांच्या बाबतीत पवारांनी एकच भूमिका घ्यायला पाहिजे. तुमच्या पक्षातील महिलांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेता. पुण्यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्याचा विषय कितीवेळा मीडियामध्ये आला. त्या पीडित मुलीने वारंवार सांगितले, अन्याय आणि अत्याचार झाला. पण उलट चित्रा वाघ यांच्यावरच त्या मुलीला आरोप करायला लावलेत. हे जे चुकीचे काम सुरू आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला संस्कार आणि संस्कृती शिकवायची गरज नाही. महाराष्ट्राची जनता या विषयी तुम्हा संगळ्यांबद्दल जाणून आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.